आईच्या मृत्युचा विरह मुलीला असह्य, ह्दयविकाराने मुलीचाही मृत्यू 

shivkashi.
shivkashi.

गिरगाव (ता.वसमत) : वसमत तालुक्यातील बारेपुरवाडी येथील शिवकाशीबाई गणपतराव दतगोडे (वय ८५) या दोन महिन्यापासून आजारी होत्या. त्यांचे बुधवारी (ता.पाच) निधन झाले. आईच्या निधनाची वार्ता खाजमापुर वाडी येथे त्यांच्या मुलीला कळताच त्यांना याचा धक्का बसून मुलीचा ह्रदयविकाराने मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. 

वसमत तालुक्यातील बारेपुरवाडी येथील शिवकाशीबाई दतगोंडे या आजारी होत्या. त्या दोन महिन्यापासून आजाराने त्रस्त होत्या, बुधवारी त्यांचे निधन झाले. ही माहिती खाजमापुर वाडीतील त्यांची मुलगी त्रिवेणीबाई नरडले (वय ५५) यांच्या मुलाला नातेवाईकांनी फोनवर सांगितली. त्यांनी ही माहिती घरी सांगितली, या वेळी त्रिवेणीबाई यांना धक्का बसुन त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. यामुळे त्यांना गिरगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. आईच्या मृत्युमुळे लेकीचा पण मृत्यु झाल्याने खाजमापुर वाडी येथे हळहळ व्यक्त होत आहे. आई शिवकाशीबाई यांच्यावर बारेपुरवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले तर लेकीवर खाजमापुर वाडी येथे दुपारी चारच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. त्रिवेणाबाई नरडले यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. 

कळमनुरीत उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाइ 
कळमनुरी : लॉकडाउनचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुरुवारी (ता.सहा) अकरा मोटर सायकल चालकाविरुद्ध पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. माळेगाव येथील एका हॉटेल चालकाविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. लॉकडाउनचे पालन व्हावे याकरिता पोलिस प्रशासनाकडून पोलिस निरीक्षक रणजीत भोईटे, सहायक पोलिस निरीक्षक एस.जी.रोयलावार, उपनिरीक्षक ज्ञानोबा मुलगीर, प्रतिभा शेटे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी शहरात बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान बंदचे उल्लंघन करणाऱ्या व शहरात विनाकारण मोटरसायकल घेऊन फिरणाऱ्या अकरा मोटरसायकल स्वारांना पोलिस पथकाने ताब्यात घेत दंडात्मक कारवाई करून चार हजार ९०० रुपये दंड वसूल केले तर माळेगाव येथे हॉटेल उघडून व्यवसाय करणाऱ्या एका हॉटेल मालकाविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. बंद दरम्यान कुठलेही कारण नसताना विनाकारण फिरणाऱ्या नागरिका विरुद्ध पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक श्री भोईटे यांनी सांगितले आहे. तर प्रशासनाकडून करण्यात आलेल्या बंदला विरोध करणाऱ्या वंचित आघाडीच्या पाच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. 

अवैध वाळू उपसा करून विक्री केल्याप्रकरणी गुन्हा 
कळमनुरी : चोरट्या पध्दतीने वाळू उपसा व विक्री करून परत निघालेल्या ट्रॅक्टरने विजेच्या खांबाला धडक देऊन ५० हजारांचे नुकसान केल्याप्रकरणी ट्रॅक्टर चालक व मालकाविरुद्ध कळमनुरी पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता.सहा) गुन्हा दाखल करण्यात आला. परिसरात असलेल्या वाळू घाट व ओढ्याच्या पात्रामधून चोरट्या पद्धतीने वाळू उपसा करून त्याची शहरात विक्री केली जात आहे. याच पद्धतीने शहरातील ब्राह्मण गल्ली भागात गुरुवारी सकाळच्या सुमारास चोरट्या पद्धतीने वाळूची ट्रीप टाकून निघण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रॅक्टर चालकाच्या चुकीने विजेच्या खांबांना धडक लागली. यामध्ये विजेचा खांब वाकल्या गेला व वीजवाहिन्या लोंबकळल्या गेल्या. यामध्ये झटका लागून बाजूलाच असलेला विजेचा दुसराही खांब क्षतीग्रस्त झाला. घटनेची माहिती मिळताच बाळापुर विभागाचे मंडळाधिकारी आनंदराव सुळे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने ट्रॅक्टर चालकाला जागेवर थांबून ठेवले व या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पोलिस कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर व चालकाला ताब्यात घेतले. याप्रकरणी आनंदराव सुळे यांच्या तक्रारीवरून ट्रॅक्टर चालक ऋषिकेश त्र्यंबक कल्याणकर (रा.नांदापूर) व मालक नागेश पवार यांच्याविरोधात तक्रार दिली असून वीज वितरणच्या विजेच्या खांबांना धडक मारून ५० हजार रुपये नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला तर चोरट्या पद्धतीने वाळू उपसा करून विक्री केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. 

संपादन ः राजन मंगरुळकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com