देवणी तालुक्यात दोघांचा डेंगीने मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

देवणी(जि. लातूर)तालुक्‍यासह परिसरात डेंगीने थैमान घातले असून सोमवारी (ता. 14) वलांडी (ता. देवणी) येथील एका अठरावर्षीय मुलीचा डेंगीने मृत्यू झाला. तर रविवारी (ता. 13) याच आजाराने हिसामनगर (ता. देवणी) येथील एका 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसांत डेंगीने दोन बालकांचे बळी घेतले असून वलांडीसह परिसरातील अनेक रुग्ण डेंगीच्या तापाने फणफणत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

देवणी(जि. लातूर) ः तालुक्‍यासह परिसरात डेंगीने थैमान घातले असून सोमवारी (ता. 14) वलांडी (ता. देवणी) येथील एका अठरावर्षीय मुलीचा डेंगीने मृत्यू झाला. तर रविवारी (ता. 13) याच आजाराने हिसामनगर (ता. देवणी) येथील एका 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसांत डेंगीने दोन बालकांचे बळी घेतले असून वलांडीसह परिसरातील अनेक रुग्ण डेंगीच्या तापाने फणफणत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

पावसाळी वातावरणामुळे सर्वत्र पसरलेली अस्वच्छता, प्रशासन आणि स्थानिक यंत्रणेच्या दुर्लक्ष, वलांडीसह परिसरातील रुग्णांना सेवा देण्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात होत असलेली गैरसोय, यामुळे डेंगींचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढतच असून स्थानिक सुविधा नसल्याने वलांडी परिसरातील सुमारे पन्नासहून अधिक बालकांवर लातूरच्या वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

त्यातच दोन बालकांचा मृत्यू झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. 
वलांडी येथील सय्यद नाजिया जलील या व्यंकटेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. तर हिसामनगर येथील शहाजान दस्तगीर शेख (वय 10) या बालकाचा लातूर येथे उपचारादरम्यान रविवारी (ता. 13) मृत्यू झाला. 

साठवलेले पाणी, अस्वच्छता यामुळे डेंगीचे रुग्ण वाढत आहेत. बहुतांश रुग्ण लातूरला उपचार घेत असल्यामुळे आमच्याकडे त्याविषयीची माहिती व आकडेवारी उपलब्ध नाही. हिसामनगर येथील शहाजना दस्तगीर शेख या मुलाला डेंगीसदृश आजार होता. त्याचा रविवारी मृत्यू झाला. आरोग्य विभागाकडून याबाबत आवश्‍यक त्या उपाययोजना आखण्यात येत आहेत. शिवाय यासंदर्भात ग्रामपंचायतींना उपाययोजना करण्यासंदर्भात सांगितले आहे. 
- डॉ. डी. एन. जाधव, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, वलांडी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: death of two by dengue in deoni