विनाकारण घराबाहेर पडल्यास गाढवावरून धिंड, ग्रामस्थांचा निर्णय

रामदास साबळे
Tuesday, 31 March 2020

बीड जिल्ह्यातील टाकळी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी विनाकारण घराबाहेर पडू नये, या आदशाचे उल्लंघन करणाऱ्या ग्रामस्थांची गाढवावरून धिंड काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

केज (जि. बीड) -  तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी विनाकारण घराबाहेर पडू नये, या शासनाच्या आदशाचे उल्लंघन करणाऱ्या ग्रामस्थांची गाढवावरून धिंड काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रविवारी (ता. २९) ग्रामस्थांना विश्वासात घेऊन घेण्यात आला आहे. त्यास ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शवून पालन करण्याचे ठरविले आहे.

सध्या देशात कोरोनासारख्या आपत्तीने धूमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. शासकीय कर्मचारी स्वत:चा जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. जनतेला शटडाऊनची हाक देण्यात आली आहे. सध्या सर्वत्र संचारबंदी व जिल्हाबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. त्यामुळे जनतेला विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. 

शासनाच्या आदशाचे काटेकोर पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी गावात विनाकारण घराबाहेर तीन वेळा पडणाऱ्या व्यक्तीस पाचशे रूपये दंड करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर चौथ्या वेळी जर तो परत घराबाहेर फिरताना आढळून आल्यास मात्र त्याची गाढवावर बसवून धींड काढून पोलीस कारवाई करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रविवारी ग्रामपंचायत कार्यालयाने व ग्रामस्थांनी घेतला आहे. त्यामुळे सध्यातरी टाकळी येथील ग्रामस्थ विनाकारण घराबाहेर पडण्याचा धोका स्वीकारताना दिसत नाहीत. 
 

शासनाने घराबाहेर पडू नये असे आवाहन जनतेला केले तरी अनेकजण त्याकडे गांभीर्याने न पाहता नियमांचे उल्लंघन करत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामस्थांनी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. याची ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रोसिडींग रजिस्टरवर नोंद घेतली आहे. 
-विष्णू घुले, सरपंच, टाकळी, ता. केज 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The decision to take a procession out of a donkey