मदत जाहीर करा अन्यथा गनिमी कावा आंदोलन : राजू शेट्टी

कैलास चव्हाण
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

येत्या आठ दिवसांत अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्या, अन्यथा कुठल्याही जिल्हाधिकारी कार्यालयात गनिमी कावा पद्धतीने सोयाबीनचे खराब झालेले भुसकट फेकून आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी येथे काळजीवाहू सरकारला दिला आहे.

परभणी : येत्या आठ दिवसांत अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्या, अन्यथा कुठल्याही जिल्हाधिकारी कार्यालयात गनिमी कावा पद्धतीने सोयाबीनचे खराब झालेले भुसकट फेकून आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी येथे काळजीवाहू सरकारला दिला आहे.

परभणीत शेट्टी यांच्या नेतृवाखाली बुधवारी (ता. 6) शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढला. परभणी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावरुन निघालेल्या मोर्चाचो रुपांतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील मैदानावर सभेत झाले. यावेळी ते बोलत होते. सध्या शेतकरी अडचणीत असताना राज्यकर्त्ये सत्तेचा वाटा करण्यात व्यस्त आहेत. 13 दिवसापासून अधांतरी असलेल्या या सरकारचा तेरावा करण्याची वेळ आली आहे.

अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे सरसकट नुकसान झाले असताना कागदांचा खेळ कशाला मांडता असा सवालही त्यांनी यावेळी केला. एरवी डिजीटल इंडियाचा अट्टहास मग आता कशासाठी कागदांची अट असे सांगुन शेतकऱ्यांना त्रास देणे थांबवा अन्यथा परिणामाला सामोरे जावे लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे.पिक विमा योजना ही खाजगी कंपन्याच्या नफ्यासाठी असून, सरकार आणि कृषि अधिकारी यांना विमा कंपन्याकडून मलिदा मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला. कृषिअधिकारी हवेत पंचनामे करत असून पिक कापनी प्रयोगातदेखील नुसती बनवाबनवी केली असल्याचे ते म्हणाले.

पिक विमा कंपन्या आता नुकसान भरपाई देण्यासाठी नाटक करत आहे,कागदांच्या घोळात शेतकऱ्यांना अडकुन भरपाईपासून वंचीत ठेवण्याचा प्रयत्न सुरु असून जिल्ह्यासह मुंबईतील विमा कंपन्याची कार्यालय शेतकऱ्यांनी शोधुन ठेवा,मदत नाही मिळाली तर एकाही कंपनीला सोडणार नाही, असा इशारा त्यांनी विमा कंपन्यांना दिला आहे.

दरम्यान, येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर झाली तर ठिक अन्यथा संघटना गनिमी कावा पध्दतीने जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करेल असे त्यांनी जाहीर केले.यावेळी वस्त्रोद्दोग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी सरकारवर तोफ डागली. प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. प्रकाश पोपळे, जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रसिका ढगे, केशव आरमळ, डिंगाबर पवार, मुंजाजी लोडे आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Declare Help Otherwise Ghanimi Kawa Movement says Raju Shetty