औरंगाबाद - तब्बल नऊ वर्षे चाललेले काम संपून दोन वर्षांपूर्वीच दिवाळीला शासकीय दंत महाविद्यालयाच्या विद्यार्थी वसतिगृहाला मुहूर्त लागणार होता. मात्र, पुन्हा निधीसाठी घोडे अडले. आता वसतिगृहाचे ठेकेदाराकडील काम पंधरा दिवसांपूर्वीच पूर्ण झाले. वीजजोडणीसाठी ट्रान्स्फॉर्मर उभा राहिला. मात्र, घाटीच्या कर्मचारी निवास्थानांवर असलेल्या 47.89 लाख रुपयांच्या थकबाकीमुळे महावितरण वीजजोडणी देत नसल्याने वसतिगृहाला मुहूर्ताची प्रतीक्षा कायम आहे.
शासकीय दंत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनाही सुरक्षित असलेल्या घाटीच्या परिसरात वसतिगृह असावे, अशी जुनी मागणी होती. ती मागणी मंजूर होऊन प्रत्यक्षात 18 फेब्रुवारी 2009 मध्ये 8.98 कोटींच्या 240 विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाला राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली. आतापर्यंत आठ कोटी 20 लाख रुपयांचा खर्च झाल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली. 78 लाखांची बाकी अजून शासनाकडून मिळण्याची प्रतीक्षा आहे.
मात्र, कंत्राटदाराने बहुतांश काम पूर्ण केले. दोन वर्षांपूर्वी 35 लाख रुपये फर्निचरसाठी मिळाले होते. मात्र, काम पूर्ण न झाल्याने ते पैसे परत गेले. तो निधी परत मिळाल्यास त्यात 108 खोल्यांत पलंग, कपाट, टेबल-खुर्चीचे 240 सेट, भोजनगृह, अतिथीगृह, पुरुष, स्त्री वॉर्डनच्या खोल्यांचे फर्निचर प्रस्तावित आहे. तर घाटीच्या थकबाकीशी दंत महाविद्यालयाचा संबंध नसून वीजजोडणीसाठी वारंवार पाठपुरावा सुरू असल्याचे अधिष्ठाता डॉ. एस. पी. डांगे यांनी सांगितले.
जुने वसतिगृह जीर्ण
दीडशे विद्यार्थ्यांसाठी 1982 मध्ये आमखास मैदानासमोरील जागेत बांधण्यात आलेल्या इमारतीची सध्या दुरवस्था झालेली आहे. सध्या तिथे 140 विद्यार्थी राहतात. त्यांना दंत महाविद्यालयात येणे गैरसोयीचे ठरते. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी दोन विद्यार्थ्यांचा अपघात झाला. तर वसतिगृहातही काही दिवसांपूर्वी स्लॅब कोसळल्याने दोन विद्यार्थी जखमी झाले होते.
नव्याने मिळणार सर्व सुविधा
या वसतिगृहात एकशे वीस विद्यार्थी व विद्यार्थिनींची राहण्याची सर्वसोयींनीयुक्त व्यवस्था करण्यात आली आहे. वसतिगृहात शाकाहारी व मांसाहारी असे दोन स्वतंत्र भोजनकक्ष, दोन स्वयंपाक घर, दोन वॉर्डन निवास, मनोरंजन कक्ष, जीमखाना, खुला रंगमंच, इनडोअर प्लेग्राउंड, बैठक हॉल, सहा गेस्ट रूम, गिरणी, भंडारघर अशी सुविधा या वसतिगृहात करण्यात आली आहे.
घाटीची थकबाकी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कर्मचारी निवास्थानाच्या 47.89 लाख रुपयांच्या थकबाकीमुळे सध्याच्या कर्मचाऱ्यांनाही वीजजोडणीला अडचणी येत आहेत. त्यामुळे विविध मार्गांनी केलेल्या जोडणीतून अनेकदा अपघातांच्या घटनाही घडत आहे. वर्षभरापूर्वीच निवास्थानांत शॉर्टसर्किटने आग लागली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.