अखेर 11 वर्षांनी डेंटलच्या विद्यार्थ्यांना मिळाले वसतिगृह

योगेश पायघन
Friday, 22 November 2019

ऑगस्टपासून घाटीच्या थकबाकीमुळे अडलेले वीज कनेक्‍शन मिळाल्याने फर्निचरची वाट न पाहता जुन्या वसतिगृहातील 140 पैकी 60 विद्यार्थ्यांना नव्या वसतिगृहात खोल्या देण्यात आल्या.

औरंगाबाद : शासकीय दंत महाविद्यालयाच्या (डेंटल) विद्यार्थी वसतिगृहाचे तब्बल अकरा वर्षे चाललेले काम अखेर पूर्ण झाले. ऑगस्टपासून घाटीच्या थकबाकीमुळे अडलेले वीज कनेक्‍शन मिळाल्याने फर्निचरची वाट न पाहता जुन्या वसतिगृहातील 140 पैकी 60 विद्यार्थ्यांना नव्या वसतिगृहात खोल्या देण्यात आल्या.

80 विद्यार्थिनी दोन दिवसांत या वसतिगृहात शिफ्ट होतील. त्यामुळे जुन्या वसतिगृहातील समस्यांपासून विद्यार्थ्यांची अखेर सुटका झाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. वीजजोडणीसाठी ट्रान्स्फॉर्मर उभा असताना घाटीच्या कर्मचारी निवासस्थानांवर असलेल्या 47.89 लाख रुपयांच्या थकबाकीमुळे महावितरण वीजजोडणी देत नव्हते. या प्रश्‍नाला "सकाळ'ने वाचा फोडली होती.

दरम्यान, अधिष्ठाता डॉ. एस. पी. डांगे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी मध्यस्थी केल्याने नुकतेच महावितरणणे कनेक्‍शन दिले. वीजपुरवठा मिळाल्याने फर्निचरची वाट न पाहता साठ विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश देण्यात आला. शासकीय दंत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनाही सुरक्षित असलेल्या घाटीच्या परिसरात वसतिगृह असावे, अशी जुनी मागणी होती.

हेही वाचा - कुपोषणाची छावणी 

ती मागणी मंजूर होऊन प्रत्यक्षात 18 फेब्रुवारी 2009 मध्ये 8.98 कोटींच्या 240 विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाला राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली. आतापर्यंत आठ कोटी 20 लाख रुपयांचा खर्च झाल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली. अद्यापही 78 लाखांची बाकी अजून शासनाकडून मिळण्याची प्रतीक्षा आहे. 

या आहेत सुविधा 

या वसतिगृहात एकशे वीस विद्यार्थी व विद्यार्थिनींची राहण्याची सर्वसोयींनीयुक्त व्यवस्था करण्यात आली आहे. वसतिगृहात शाकाहारी व मांसाहारी असे दोन स्वतंत्र भोजनकक्ष, दोन स्वयंपाकघर, दोन वॉर्डन निवास, मनोरंजन कक्ष, जिमखाना, खुला रंगमंच, इनडोअर प्लेग्राउंड, बैठक हॉल, सहा गेस्ट रूम, गिरणी, भांडारघर अशा सुविधा या वसतिगृहात करण्यात आल्या आहेत. 

त्या जागेवर मुख आरोग्य रुग्णालयाचा प्रस्ताव

दीडशे विद्यार्थ्यांसाठी 1982 मध्ये आमखास मैदानासमोरील जागेत बांधण्यात आलेल्या इमारतीची सध्या दुरवस्था झालेली आहे. सध्या तिथे 140 विद्यार्थी राहतात. त्यांना दंत महाविद्यालयात येणे गैरसोयीचे ठरते. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांत दोन विद्यार्थ्यांचा अपघात झाला. वसतिगृहातही काही दिवसांपूर्वी स्लॅब कोसळल्याने दोन विद्यार्थी जखमी झाले होते. जुने वसतिगृह जीर्ण झाले असून त्याजागी मुख कर्करोगासाठी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रस्ताव दंत महाविद्यालयाने दोन वर्षांपूर्वी सादर केलेला आहे. 

दोन दिवसांत ऐंशी विद्यार्थिंनींना शिफ्ट करू

कंत्राटदाराने काम पूर्ण केल्याने ताबा मिळाला. आता 108 खोल्यांत पलंग, कपाट, टेबल-खुर्चीचे 240 सेट, भोजनगृह, अतिथीगृह, पुरुष, स्त्री वॉर्डनच्या खोल्यांचे फर्निचर प्रस्तावित आहे. हे फर्निचर येत्या पंधरा दिवसांत पुरवठा होईल; मात्र जुन्या वसतिगृहातील समस्या दिवसेंदिवस असह्य होत असल्याने विद्यार्थ्यांना तातडीने शिफ्ट केले. लेडीज विंगमध्ये गरम पाण्याच्या पुरवठ्याचे काम झाल्यावर येत्या दोन दिवसांत ऐंशी विद्यार्थिंनींना शिफ्ट करू. 
- डॉ. एस. पी. डांगे, अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय, औरंगाबाद.

फर्निचरचा प्रश्‍न कायम 

  • वसतिगृहाच्या वीज कनेक्‍शनचा तिढा सुटला 
  • डेंटलच्या 240 विद्यार्थी-विद्यार्थिनींना राहण्याची सुविधा 
  • घाटीच्या पन्नास लाखांच्या थकबाकीसाठी अडले होते घोडे 
  • विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांची मध्यस्थी 
  • अकरा वर्षांपासून सुरू होते वसतिगृहाचे बांधकाम 
  • फर्निचर अन्‌ त्यासाठी निधीची प्रतीक्षा कायम

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dental students' finally got spring time for 11 years in Aurangabad