कार्यकर्त्यांतून सक्षम नेतृत्व घडविणारी निवडणूक 

हरी तुगावकर - सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 19 जानेवारी 2017

लातूर - जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून ग्रामीण भागात काम करून जिल्हा, राज्य; तसेच देशात सक्षम नेतृत्व देता येते हे लातूरने दाखवून दिले आहे. दिवंगत नेते विलासराव देशमुख, माजी मंत्री तथा आमदार दिलीपराव देशमुख, माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, बसवराज पाटील मुरूमकर यांचे नेतृत्व याच निवडणुकीने दिले आहे. अनेक आमदारही जिल्ह्याला यातून मिळाले. त्यामुळे निवडणूक दिसायला सोपी असली तरी सक्षम नेतृत्व देणारी आहे, हे उमेदवारांनी विसरता कामा नये. 

उपसभापती ते केंद्रीय मंत्री 
बाभळगावच्या सरपंचापासून ते मुख्यमंत्री ते पुढे केंद्रीय मंत्री झालेले दिवंगत नेते विलासराव देशमुख हे एकमेव नेते. पंचायत समितीचे उपसभापती झाल्यानंतर त्यांची तालुक्‍याला ओळख झाली. यातून हे नेतृत्व पुढे आले. आमदार, राज्यमंत्री, विविध खात्यांचे मंत्री नंतर मुख्यमंत्री ते झाले; तसेच केंद्रातदेखील मंत्रीपद त्यांनी भूषविले. 

सहकारमहर्षी नाडेही घडले 
1982 पूर्वी लातूर हे उस्मानाबाद जिल्ह्यात होते. उस्मानाबाद जिल्हा परिषद होती. त्या काळात मुरूडचे शिवाजीराव नाडे हे उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे सदस्य होऊन ते उपाध्यक्ष राहिले. त्यातून त्यांचे नेतृत्व पुढे आले. याच काळात जे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष, वीज मंडळाचे सदस्य राहिले. या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी मोठे काम केल्याने त्यांची सहकारमहर्षी ओळख निर्माण झाली. 

मंत्री, राज्यमंत्री, आमदारही घडले 
माजी मंत्री दिलीपराव देशमुख हे लातूर जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष राहिले. राज्यात शेवटच्या क्रमांकावर असलेली जिल्हा परिषद त्यांनी पहिल्या क्रमांकावर आणली. स्थानिक स्वराज्य संस्थेतून ते आमदार झाले. पुढे ते मंत्री राहिले. अहमदपूरचे बाळासाहेब जाधव, बसवराज पाटील यांचे नेतृत्वही असेच पुढे आलेले आहे. वैजनाथ शिंदे, गोविंद केंद्रे, बाबासाहेब पाटील असे अनेक नेते जिल्हा परिषद व पंचायत समितीतून पुढे येत आमदार झाले आहेत. 

तालुका, जिल्हा कार्यक्षेत्र 
पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे कार्यक्षेत्र मोठे आहे. पंचायत समितीचा पदाधिकारी झाला तर त्याला तालुक्‍यात काम करता येते. जिल्हा परिषदेत पदाधिकारी झाला तर त्याचे कार्यक्षेत्र जिल्हा असते. खासदाराच्या कार्यक्षेत्रासारखे त्यांचे कार्यक्षेत्र राहणार आहे. त्यामुळे भविष्यात नेतृत्व सिद्ध करण्याची संधी या निवडणुकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना मिळणार आहे.

Web Title: Depicting leadership election