लवकरच असा दिसेल माहूरगड...

बालाजी कोंडे
Thursday, 6 February 2020

राज्यात देवीच्या साडेतीन पीठापैकी एक पूर्णपीठ असलेल्या श्री रेणुकादेवी माहूरगडाच्या विकासासंदर्भात विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईत मंत्रालयात बैठक घेतली. माहूरगडाचा विकास पंढरपूर, आळंदीच्या धर्तीवर करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. यावेळी बैठकीस पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

माहूर (जि. नांदेड) -  श्रीक्षेत्र माहूर हे देवींच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असून पर्यटनाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे स्थळ आहे. या ठिकाणी पर्यटन विकासाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्मिती होणारे मोठे तीर्थक्षेत्र आहे. पंढरपूर व आळंदीच्या धर्तीवर श्रीक्षेत्र माहूर गडचा विकास आराखडा सादर करावा, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केल्या.  

श्रीक्षेत्र माहूरगड विकास आराखड्यासंदर्भात विधानभवन मुंबई येथे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. चार) आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

हे ही वाचा - आता... छेडछाड कराल तर बसणार ‘शॉक’

मुंबईत घेतली आढावा बैठक

माहूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास गती देण्यासाठी मंगळवारी मुंबई येथे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली, सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली.

या वेळी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सी. पी. जोशी, अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे, कार्यकारी अभियंता एस. व्ही. तोटावाड, पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, सहायक संचालक औरंगाबाद अजित खंदारे, माहूर येथील सहायक अभियंता वसंत झरीकर, कनिष्ठ अभियंता रवींद्र उमाळे यांच्यासह संबंधित विभागातील अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

अकरा ठिकाणांचा समावेश

श्रीक्षेत्र माहूर गड विकास आराखडा यामध्ये श्री रेणुकामाता मंदिर, श्री दत्तशिखर, श्री. अनसूयामाता मंदिर यासह अकरा ठिकाणांचा समावेश आहे. त्यामध्ये धार्मिक पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन आणि पायाभूत सुविधांचा समावेश आहे.

रोप वेच्या कामासाठी केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत माहूर येथील पर्यटक सुविधा केंद्र इमारत ते श्री रेणुका देवी मंदिर, दत्त शिखर, अनसूया देवी मंदिरास जोडणाऱ्या रोप वेसाठी रेणुका देवी मंदिर येथे लिफ्टसह फूटओवर ब्रिज या कामासाठी निविदा स्तरावर काम सुरू आहे. या बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सादरीकरणाच्या माध्यमातून या वेळी माहिती देण्यात आली.

हे ही वाचलेच पाहिजे - भयंकर! तो शिक्षक मुलींना दाखवायचा...

२१६ कोटी रुपयांची तरतूद

श्रीक्षेत्र माहूर गडासाठी २०१६ - १७ मध्ये २१६ कोटी रुपयांची तरतूद होती. विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी लागणारी रक्कम दोन वर्षांत टप्प्याटप्प्याने घेऊन हा आराखडा पूर्ण व्हावा, माहूर येथील विकास आराखडा तयार करीत असताना पुरातत्व विभागाने मंदिराचा विकास आराखडा तयार करून सादर करावा.

तसेच पुरातत्व विभागाच्या निर्देशानुसार ही कामे करण्यात यावीत. माहूर येथे उत्सव काळात मंदिरामध्ये मोठी गर्दी होते. त्या ठिकाणी व्हेंटिलेशनसाठी पुरातत्व विभागाची परवानगी घेऊन त्या ठिकाणी एसी (वातानुकूलित यंत्रणा) बसविण्यात यावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी या वेळी दिले.

माहूरकडे दुर्लक्ष नको

राज्यातील इतर तीर्थक्षेत्राचा झपाट्याने विकास झाला. माहूरकडे दुर्लक्ष झाले. कमीत कमी कालावधीत विभागनिहाय निधीचे नियोजन करून पुढील दोन वर्षांत आराखड्यातील अंतर्भूत असलेली सर्व कामे विभागनिहाय पूर्ण करण्यात यावी, जेणे करून येत्या काळात येथे येणाऱ्या सर्व भक्तांना या विकासाचा लाभ घेता येईल, अशा सूचना पालकमंत्री चव्हाण यांनी दिल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The development of the mahurgad will take place on the shores of these 'pilgrimages