देवेंद्र फडणवीस व पंकजा मुंढेची परभणीतील भेट ठरतोय चर्चेचा विषय

गणेश पांडे
Saturday, 24 October 2020

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी सुरु केली आहे. बुधवारी (ता.21) देवेंद्र फडणवीस हे परभणी जिल्हयातील नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले होते.

परभणी ः राज्यातील सत्ता काळात रुसवे- फुगवे झाल्यानंतर तब्बल एक वर्षाच्या प्रदिर्घ कालावधीनंतर भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे हे दोन एकत्र आले. त्यांना एकत्र आणण्याचे संपूर्ण श्रेय जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर- साकोरे यांनाच द्यावे लागेल. आमदार बोर्डीकर यांच्या घरी मुक्कामी असलेल्या या दोन नेत्यांची झालेली भेट सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. 

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी सुरु केली आहे. बुधवारी (ता. 21) देवेंद्र फडणवीस हे परभणी जिल्ह्यातील नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यांच्यासोबत माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे या देखील होत्या. तब्बल वर्षभराच्या प्रदिर्घ कालावधीनंतर हे दोन्ही नेते एकमेंकांसोबत दौऱ्यावर होते. गंगाखेडचा दौरा आटोपून देवेंद्र फडणवीस व पंकजा मुंढे यांनी सोबतच माजी आमदार मोहन फड यांच्या घरी भेट दिली. त्यानंतर त्यांनी रात्री सरळ आमदार मेघना बोर्डीकर यांचे निवासस्थान गाठून मुक्काम ठोकला.

हेही वाचा -  हिंगोली : समुपदेशन पद्धतीने देणार शिक्षकांना पदस्थापना

आमदार मेघना बोर्डीकर यांच्या निवासस्थानी काय चर्चा झाली

सत्ताकाळात या दोन्ही मोठ्या नेत्यामध्ये सुरु असलेली राजकीय धुसफुस सर्वश्रुत आहे. या धुसफुसीवरून नाराज झालेल्या पंकजा मुंढे कोरोना काळात घरीच होत्या. परंतू आता मराठवाड्यातील अतिवृष्टीचा दौरा सुरु झाल्यानंतर पंकजा मुंढे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिसल्या. त्यात आमदार मेघना बोर्डीकरांनी स्वताचा चाणाक्षपणा दाखवून फडणवीस व मुंढे या दोन्ही नेत्यांना स्वताच्या घरी मुक्कामी ठेवून घेतले. या काळात दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली असेल ? या प्रश्नावर जिल्हा भरात चर्चेला उधान आले आहे. दोन्ही नेत्यांची बोर्डीकरांच्या घरात लागलेली हजेरी मात्र भाजपच्या इतर नेत्यांसाठी पोटशुळ ठरली असल्याचे स्पष्ठपणे जाणवले. परंतू राजकीय हेव्यादाव्यातून दुरावलेल्या या दोन मोठ्या नेत्यांना एकत्र आणत त्यांच्यात चर्चा घडवून आणण्याचे काम आमदार मेघना बोर्डीकर यांनी अत्यंत हुशारीने केले असेच म्हणावे लागेल. दरम्यान, या दोन्ही नेत्यांमध्ये आमदार मेघना बोर्डीकर यांच्या निवासस्थानी काय चर्चा झाली असेल या संदर्भात राजकीय वर्तूळात निरनिराळ्या चर्चा रंगत आहेत.

येथे क्लिक करा -  सचखंड गुरुद्वाराच्या ‘हल्लाबोलसाठी उच्च न्यायालयाची सशर्त परवानगी -

देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर ही नाराजी

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकसान पाहणी दौऱ्यादरम्यान परभणी जिल्ह्यातील मुळ भाजपच्या नेत्यांच्या घरी भेटी दिल्या नाहीत. खरे तर त्यांचा हा दौरा धावता होता. परंतू त्यांनी माजी आमदार मोहन फड यांच्या घरी भेट देण्याचे कारण खासगी होते. श्री. फड यांच्या चिरंजीवांचे अपघाती निधन झाल्याने त्यांचे सात्वंन करण्यासाठी देवेंद्र फडणवीस व पंकजा मुंढे हे दोन नेते त्यांच्या घरी गेले होते. तेथून ते दोघे सरळ आमदार मेघना बोर्डीकर यांच्या घरी गेले. त्या ठिकाणी मात्र भाजपच्या अनेक जुन्या नेत्यांना भेटीची संधी मिळाली नाही. त्यामुळे ही पक्षातील स्थानिक नेते व कार्यकर्त्यामध्ये नाराजी दिसून आली.

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devendra Fadnavis and Pankaja Mundhe's meeting in Parbhani is a topic of discussion parbhani news