esakal | देवेंद्र फडणवीसांचा मराठवाडा दौरा आणि पंकजा मुंडे आजारी; चर्चांना फुटलं तोंड
sakal

बोलून बातमी शोधा

देवेंद्र फडणवीसांचा मराठवाडा दौरा आणि पंकजा मुंडे आजारी

देवेंद्र फडणवीसांचा मराठवाडा दौरा आणि पंकजा मुंडे आजारी

sakal_logo
By
नामदेव कुंभार

माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आजपासून मराठवाडा आणि विदर्भातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. वाशिम जिह्यातून त्यांच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात होणार आहे. ते मराठवाड्यातही जाणार आहेत. फडणवीसांच्या मराठवाड्या दौऱ्यावेळी माजी मंत्री आणि विद्यामान भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे त्यांच्यासोब असणार हे निश्चित मानले जात होते. मात्र पंकजा मुंडे यांनी आपण आजारी सांगितलं आहे. पंकजा मुंडे यांनी फडणवीस यांच्या दौऱ्याआधी ट्विट करत आपण आजारी असल्याची माहिती दिली आहे. पुढील दोन दिवस आराम करणार असल्याचेही ट्विट करत सांगितलं आहे. पंकजा मुंडे यांच्या ट्विटनंतर राजकीय चर्चेला ऊत आलाय.

गेल्या आठवड्यात मराठवाडा आणि विदर्भात धुवांधार पावसाने हजेरी लावली होती. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकासन झालं होतं. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर जाणार आहे. वाशिममधून ते तीन दिवसीय पाहणी दौऱयाला सुरुवात करणार आहेत. मात्र, या दौऱ्यावेळी पंकजा मुंडे अनुपस्थितीत राहणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दौऱयाची घोषणा आणि पंकजा मुंडे आजारी पडणं यामुळे राजकीय तर्कवितर्क बांधले जात आहेत. विधानसभा निवडणुकीपासून ते केंद्रीय मंत्रिमंडळातील विस्तारापर्यंत देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यातील कलह समोर आला होता.यामध्ये आता पुन्हा भर पडली आहे.

पंकजा मुंडे यांचं ट्विट -

अस्वस्थ... घशात फोड आले असून डॉक्टरांनी आगामी चार दिवस बोलणं टाळण्याचा सल्ला दिला आहे. फोनवरीही बोलू शकत नाही अथवा कुणाला भेटूही शकत नाही.

सरकारला पूरपरिस्थितीची माहिती देऊन मदत मिळवणार -फडणवीस

राज्यावर मोठी नैसर्गिक आपत्ती येते. तेव्हा नजर आणेवारीच्या आधारावरच आपल्याला तातडीची मदत करण्याचा विचार करावा लागतो. राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यासाठी निर्णय घ्यावा, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. ‘‘जेव्हा राज्याचे प्रमुख किंवा मंत्री नैसर्गिक आपत्तीच्या पाहणीसाठी जातात, तेव्हा प्रशासन वेगाने कामाला लागते. मी आणि प्रवीण दरेकर उद्यापासून वाशीम जिल्ह्यापासून पाहणी दौऱ्याला सुरुवात करतोय. आम्ही विदर्भ आणि मराठवाड्याच्या बऱ्याच भागांत जाणार आहोत आणि परिस्थिती पाहून सरकारकडून शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.’’

राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह प्रमुखांना निवेदने

बीड : ‘‘अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिले पाहिजे. पॅकेजची केवळ घोषणा करण्यापेक्षा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत दिली जावी आणि त्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत,’’ अशी अपेक्षा व मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षनेत्यांनाही त्यांनी शुक्रवारी निवेदने पाठविली. अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. पुरामुळे पाणी घुसून उभ्या पिकांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी जीवित आणि वित्त हानी झाली. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या अतिवृष्टीने हिरावून घेतला आहे. शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची नितांत गरज असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. जमिनीची मातीदेखील वाहून गेली आहे, त्याचीही विशेष नुकसानभरपाई दिली गेली पाहिजे. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट तर आलेलेच आहे; पण आता त्यांच्यावर सुल्तानी संकट येऊ नये याची खबरदारी सरकारने घ्यावी. नुकसानीचे सरसकट पंचनामे करून त्यांना मदतीचे विशेष पॅकेज जाहीर करावे, असेही निवेदनात म्हटले आहे.

loading image
go to top