‘मेगाभरती’ नोकरीची नव्हती तर पक्षाची... : धनंजय मुंडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

‘राज्यातील भाजप सरकारने मेगा भरतीच्या नावाखाली ७२ हजार जागांची भरती करु असे आश्‍वासन दिले होते. परंतु ती मेगाभरती नोकरभरतीची नव्हती तर पक्षातल्या भरतीची होती, असा घणाघात विधान
परिषदेतील विरोधी पक्षनेते व आमदार धनंजय मुंडे यांनी केला.

नांदेड : ‘राज्यातील भाजप सरकारने मेगा भरतीच्या नावाखाली ७२ हजार जागांची भरती करु असे आश्‍वासन दिले होते. परंतु ती मेगाभरती नोकरभरतीची नव्हती तर पक्षातल्या भरतीची होती, असा घणाघात विधान
परिषदेतील विरोधी पक्षनेते व आमदार धनंजय मुंडे यांनी केला.

नांदेड येथे गुरुवारी (ता. १९) शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पक्षाध्यक्ष शरद पवार, माजी मंत्री कमलकिशोर कदम, गंगाधरराव कुंटूरकर, आमदार प्रदीप नाईक, माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख आदी उपस्थित होते. पुढे बोलताना मुंडे म्हणाले, ‘केंद्र सरकारने दरवर्षी दोन कोटी या प्रमाणे पाच वर्षात दहा कोटी रोजगार देण्याचे आश्‍वासन दिले हाेते. प्रत्यक्षात अडीच कोटी लोकांचा रोजगार गेला. राज्य सरकारनेही दोन वर्षात ७२ हजार नोकरभरती करण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु रोजगार तर दिला नाही, तर अनेकांच्या नोकऱ्या मात्र गेल्या. ही मेगाभरती नोकरीची नव्हती तर ती पक्षाची होती.

हे ‘मोदी है तो मुमकिन है’, मुळे झाल्याचे ते म्हणाले. ‘बडे मिया तो बडे
मिया, छोटे मिया सुभानल्ला’ असा टोला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या अवास्तव आश्वासनांना लगावला.
पक्षांतर करणाऱ्याचा समाचार घेतांना खासदार उदयनराजे यांचा पक्षप्रवेश
पंतप्रधानांऐवजी अमित शहा यांच्या उपस्थित झाल्याची टीका करत ते म्हणाले की, छत्रपतींच्या घराण्यात फूट पाडण्याचे काम अण्णाजी पंतांनी केले.

सातारची गादी मुख्यमंत्रीपदापेक्षा मोठी आहे, परंतु छत्रपती शिवाजी
महाराजांचे वंशज अण्णाजी पंतांना शरण गेले. त्यामुळे इतिहास काय लिहिला जाईल, अशी पृछा श्री मुंडे यांनी केली. शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या सरकारने अरबी समुद्रातील शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काय झाले? असा सवाल केला. अॅड. प्रकाश आंबेडकर आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या टीकेचा समाचार घेताना ते म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या राज्यात खुल्या प्रवर्गातील जागेवर त्यांच्याच निवडून आणण्याचे काम शरद पवारांनी केले. लोकसभा निवडणुकीनंतर तरुणांच्या डोक्यातील भूत उतरल्यामुळे आगामी निवडणुकीत भाजप सरकारला पुरोगामी महाराष्ट्राच्या भूमीत गाडल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार त्यांनी यावेळी कला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhananjay Munde attacks on bjp at Nanded about mahabharti