धारूर किल्ल्याची नवीन भिंतही ढासळली, ऐतिहासिक ठेवा नामशेष होण्याच्या मार्गावर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 September 2020

किल्ले धारूर शहराला ऐतिहासिक ओळख देणाऱ्या आणि इतिहासातील अनेक प्रसंगाचा साक्षीदार असलेला येथील भुईकोट किल्ल्याच्या नव्याने बांधलेल्या भिंती ढासळत आहेत.

किल्ले धारूर (जि.बीड) : किल्ले धारूर शहराला ऐतिहासिक ओळख देणाऱ्या आणि इतिहासातील अनेक प्रसंगाचा साक्षीदार असलेला येथील भुईकोट किल्ल्याच्या नव्याने बांधलेल्या भिंती ढासळत आहेत. पुरातत्व विभागामुळेच धारूरचा ऐतिहासिक ठेवा नामशेष होत असल्याचा आरोप इतिहासीप्रेमींनी केला.

खासदार निंबाळकरांचा एक फोन, बसला चोवीस तासांत डीपी, शेतकऱ्यांनी मानले आभार

पुरातत्व विभागातील अधिकाऱ्यांनी कानाडोळा केल्याने पाच कोटी रुपये खर्चून हाती घेतलेले नूतनीकरणाचे काम निकृष्ट झाले आणि चार वर्षांतच पुन्हा भिंती ढासळायला सुरवात झाली. सोमवारी (ता. सात) रात्री झालेल्या पावसात नव्याने बांधलेली दुसरी भिंतही ढासळली. येथील ऐतिहासिक किल्ल्यात २०१३ मध्ये राज्य पुरातत्व विभागाकडून डागडूजी करण्यास सुरवात झाली होती.

हे काम गायत्री कन्स्ट्रक्शन औरंगाबाद या कंत्राटदाराकडून करण्यात आले. या नवीन कामापैकी महिनाभरापूर्वीच खारी दिंडी परिसरातील भिंत कोसळली होती. सदर काम निकृष्ट असल्याची तक्रार शहरातील इतिहासप्रेमी नागरिकांनी तत्कालीन जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्याकडे केली होती. प्रत्यक्ष भेटी दरम्यान नागरिकांनी पुरातत्व खाते, विभागीय आयुक्तांकडे तक्रारीही केल्या. कंत्राटदारांशी जवळीक असलेल्या पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष केले.

लातुरात शिवभोजन थाळीची पार्सल सेवा जोरात,सव्वातीन लाख जणांची भागवली भूक

परिणामी, चारशे वर्षांचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या किल्यात नव्याने बांधलेल्या भिंती अवघ्या चार वर्षांत धराशायी होत आहेत. भिंती बांधत असताना त्याची सांधेमोड व लांब छावण्याचा (शिळा) आवश्यक वापर करावयाच्या सुचनाकडे दुर्लक्ष करण्यात आले. एकीकडे शेकडो वर्षांपासून अभेद्य असलेल्या पुरातन भिंती तग धरून असताना नवीन भिंती पडत आहेत. पुरातत्व विभागाने तत्काळ या कामाची चौकशी करून निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांवर गुन्हा नोंदवावा, अशी मागणी इतिहासप्रेमींनी केली आहे.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dharur Fort's New Wall Collapsed Beed News