मधुमेह, रक्तदाब, हृदयविकाराचा आहे त्रास, मग नोंदणी करणे गरजेचे...

madhumeh
madhumeh

हिंगोली : कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, क्षयरोग, कर्करोग, दमा, किडनी विकार असलेल्या व्यक्तींना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे, अशा व्यक्तींनी नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयात आपली नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

मधुमेही, रक्तदाब, हृदयविकार, क्षयरोग, दमा, कर्करोग, किडनी विकार रुग्णांनी अतिरिक्त खबरदारी घेणे आवश्यक आहे. कारण अशा व्यक्तींची रोग प्रतिकारशक्ती ही सर्वसामान्यांच्या तुलनेने कमी झालेली असते आणि त्यांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांच्या आरोग्याबाबत अधिक समस्या उद्‍भवू शकते. तसेच गरोदर महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांनीही आपल्या आरोग्याची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच श्वास घ्यायचा त्रास जाणवत असेल किंवा सर्दी, ताप व खोकला अधिक काळ असल्यास त्यांनी तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

या ठिकाणी करा नोंदणी 
मधुमेही, रक्तदाब, हृदयविकार, क्षयरोग, दमा, कर्करोग, किडनी विकार असलेल्या व्यक्तींनी आपल्या नजीकच्या हिंगोली तालुक्यातील सिरसम, नरसी, फाळेगाव, भांडेगाव, सेनगाव तालुक्यातील कवठा, गोरेगाव, साखरा, कापडसिंगी, औंढा तालुक्यातील शिरड शहापूर, जवळाबाजार, लोहारा, पिंपळदरी, वसमत तालुक्यातील हट्टा, हयातनगर, टेंभुर्णी, पांगराशिंदे, कुरुंदा, गिरगांव आणि कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा, रामेश्वर तांडा, पोतरा, वाकोडी, आखाडा बाळापूर, मसोड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, तर सेनगाव, औंढा नागनाथ, आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालय, कळमनुरी किंवा वसमत येथील उपजिल्हा रुग्णालय आणि हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात आपली नोंदणी करावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

मास्कचा वापर झाला कमी 
सद्य:परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत असून यापासून आपला बचाव करण्यासाठी नागरिकांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे, वेळोवेळी हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे, आजारी व्यक्तींच्या संपर्कात राहणे टाळावे आणि स्वच्छ राहण्याचा सल्ला जिल्हा प्रशासनामार्फत वेळोवेळी देण्यात येत आहे. परंतु, जिल्ह्यात अनेक ठिकाणी या बाबत विशेष काळजी घेतली जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. नागरिक बाहेर किंवा बाजारात फिरते वेळी, गरजूंना नागरिक, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था मदत किंवा वितरण करते वेळी मास्कचा वापर करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. या करिता जिल्हा प्रशासनामार्फत सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दोन हजार रुपयांची दंडाची कारवाई करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे, अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे श्री. जयवंशी यांनी सांगितले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com