बीड जिल्ह्यात मेडिकलच्या आगीत डॉक्टरचा जळून मृत्यू; एकजण जखमी 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 8 June 2020

मेडिकलला आग लागून डॉ. सुधाकर भाऊसाहेब चोरमले यांचा जळून मृत्यू, तर एकजण जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली. या घटनेमागचे कारण स्पष्ट झाले नसले, तरी याबाबत चर्चेला उधाण आले असून पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आहे. 

गेवराई (जि. बीड) - तालुक्यातील बागपिंपळगाव कॅम्प तलवाडा फाटा येथील मेडिकलला आग लागून स्फोट झाल्याची घटना घडली. स्फोटात डॉ. सुधाकर भाऊसाहेब चोरमले यांचा जळून मृत्यू, तर एकजण जखमी झाल्याची घटना सोमवारी (ता. आठ) पहाटे दोनच्या सुमारास घडली. या घटनेमागचे कारण स्पष्ट झाले नसले, तरी याबाबत चर्चेला उधाण आले असून पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आहे. 

याबाबत माहिती अशी, की तालुक्यातील जायकवाडी वसाहत बागपिंपळगाव येथील डॉ. सुधाकर चोरमले यांचे तलवाडा फाटा येथे रुग्णालय असून, त्यालगत बेलगाव येथील एका व्यक्तीचे मेडिकल आहे. पंधरा दिवसांपासून हे रुग्णालय व मेडिकलच्या बाजूला डॉ. औटे यांचे मानवकल्याण सेवाभावी संस्था संचलित साईबाबा स्वास्थ्य केंद्र कार्यरत झालेले आहे; मात्र सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास या मेडिकलला आग लागली. यात साई समर्थ रुग्णालयाचे डॉ. सुधाकर भाऊसाहेब चोरमले यांचा जळून मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेला एकजण जखमी झाला आहे. घटनेचे नेमके कारण पोलिस चौकशीनंतर समोर येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctor burnt to death in Beed district; One was injured