डॉक्टरचा मृतदेह शोधताना जवानाचा बुडून मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

doctor death body searching jawan death Accident at Majalgaon Dam

डॉक्टरचा मृतदेह शोधताना जवानाचा बुडून मृत्यू

माजलगाव : माजलगाव धरणात बुडून मृत्यू झालेल्या डॉक्टरचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोल्हापूर येथील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या जवानाचा मच्छीमारांच्या जाळ्यात अडकून मृत्यू झाला. ही दुर्दैवाची घटना सोमवारी सकाळी घडली. राजशेखर प्रकाश मोरे (३०) असे मृताचे नाव आहे.

बेलोरा (ता. माजलगाव) येथील डॉ. दत्तात्रय श्रीमंत फपाळ (वय ४५) हे रविवारी (ता. १८) सकाळी धरणात पोहण्यासाठी गेले होते. दम लागल्याने ते पाण्यात बुडाले. प्रशासनाने परळी, बीड येथील बचाव पथकांना पाचारण करून तातडीने त्यांचा शोध सुरू केला होता. मात्र सायंकाळी साडेसहापर्यंत डॉ. फपाळ यांचा शोध लागला नव्हता.

त्यामुळे कोल्हापूर येथील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला (केडीआरएफ) पाचारण करण्यात आले होते. त्यानुसार अकरा जवानांचे पथक दाखल झाले होते. डॉ. फपाळ यांचा मृतदेह शोधण्यासाठी पथकातील राजशेखर प्रकाश मोरे, शुभम काटकर हे ऑक्सिजन लावून धरणात उतरले. मच्छीमारांच्या जाळ्यात दोघेही अडकले. यात मोरे यांच्या पाठीवरील ऑक्सिजन सिलिंडर बाजूला गेला. दरम्यान, काटकर पाण्याबाहेर आले तेव्हा राजशेखर मोरे हे पाण्यातच असून त्यांची ऑक्सिजनची नळकांडी पाण्यावर तरंगताना दिसली. मच्छीमार महिलांसह परळी, बीड येथील बचाव पथकाने शर्थीचे प्रयत्न करून तीन तासानंतर मोरे यांना पाण्याबाहेर काढले. त्यांना ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

जिल्हाधिकारी उतरले पाण्यात

धरणात जवान बेपत्ता झाल्याचे कळताच जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी घटनास्थळी धाव घेतली. मनोधैर्य वाढविण्यासाठी ते स्वतः अन्य जवानांच्या बोटीतून धरणातील पाण्यात उतरले. उपविभागीय अधिकारी निलम बाफना, तहसीलदार वर्षा मनाळे, पोलिस घटनास्थळी तळ ठोकून होते.

साथीदारांनी फोडला हंबरडा

कोल्हापूर येथील जवानाला डॉक्टरांनी मृत घोषित करताच त्यांच्या साथीदारांनी रुग्णालयात हंबरडा फोडला. अनेक वर्षे सोबत काम करणाऱ्या साथीदाराच्या दुर्दैवी मृत्यूने सर्वचजण रडत होते. त्यामुळे रुग्णालयातील अनेकांचे डोळे पाणावले होते.

डॉक्टरचा मृतदेह ३६ तासांनी सापडला

धरणात बेपत्ता झालेल्या डॉ. दत्तात्रय फपाळ यांचा मृतदेह ३६ तासांच्या अथक प्रयत्नानंतर आज सायंकाळी पाचच्या सुमारास सापडला. मृतदेह शोधण्यासाठी आलेल्या कोल्हापूर येथील पथकातील एका जवानाचा मृत्यू झाल्याने अन्य सहकाऱ्यांनी बचाव कार्य काहीकाळ थांबवले होते. तोपर्यंत बीड, परळी येथील बचाव पथकांसह स्थानिक मच्छिमारांकडून शर्थीचे प्रयत्न सुरूच होते.

राजशेखर मोरे या मृत जवानाच्या कुटुंबीयांस दहा लाख रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच नागरिकांनी धरण कार्यक्षेत्रात जीव धोक्यात घालून पोहण्याचे टाळावे.

- प्रकाश सोळंके, आमदार.

Web Title: Doctor Death Body Searching Jawan Death Accident At Majalgaon Dam

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..