औसा - नेता एखाद्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे कसा उभा राहिला पाहिजे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे अजित पवार. येथील एन. बी. शेख यांच्या कुटुंबाशी पवार कुटुंबाचे असलेले नाते संबंध महाराष्ट्राला अवगत आहेत..एन. बी. शेख यांच्या निधनानंतर अजित पवारांनी त्यांचा मुलगा डॉ. अफसर शेख यांना मोठे राजकीय बळ दिले. सहा वेळा उपमुख्यमंत्री पदावर विराजमान असलेल्या अजित पवारांनी एखाद्या पित्याप्रमाणे अफसर शेख यांचे लाड पुरविले. त्यांनी केलेली कुठलीही मागणी हसत हसत स्वीकारली आणि ती पूर्णही केली..राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता नगरपालिकेवर असताना विविध योजनांसाठी अजित पवारांनी डॉ. अफसर शेख यांना निधी देत त्यांच्या कामाचे अवलोकन करून शाबासकी दिली. मराठवाड्यात अफसर शेख यांच्या रुपाने त्यांना एक अल्पसंख्यांक नेता उदयास येत असल्याचा मोठा आनंद होता.अजित पवार हे लातूर, धाराशिव जिल्ह्यात आले आणि त्यांच्या स्वागताला अफसर शेख नाहीत, असे कधीच झाले नाही. ते अफसर शेख यांना नेहमी 'डॉक्टर' म्हणुनच हाक मारायचे. आता ही हाक अफसर शेख कधीच ऐकू शकणार नाहीत, याचे शल्य त्यांना जन्मभर राहील. तक्रारीनंतरही अफसर शेख यांना समजून घेतले….डॉ. अफसर शेख हे दादांचे लाडके असल्याचे सर्वांनाच माहिती होते. अफसर शेख यांच्या तक्रारी घेऊन काहीजण थेट बारामतीला गेले होते. त्यांच्या तक्रारी नीट ऐकून घेत, अजित पवारांनी फोनवरून अफसर शेख यांना समज देत— "असं करू नको बाब"—म्हणत त्यांच्यावर मायेची पांघरूण घातली..फोन उचलला नाही तरीही प्रेम कायम…दादांचे लाडके म्हणून ओळखले जाणारे अफसर शेख हे सहसा कोणाचा फोन उचलत नाहीत, असा आरोप त्यांच्यावर नेहमी केला जातो. याच अनुभवाला खुद्द अजितदादाही अनेकदा सामोरे गेले. दादांचा फोन अफसर शेख यांनी न उचलल्यामुळे, त्यांनी त्यांच्या चुलत भावाला फोन करून—"त्याला फोन दे"—असे सांगितले. नंतर दादांनी अफसर शेख यांच्याशी बोलणे केले."वारे पठ्ऱ्या, माझाही फोन नाही उचलला!" अशी कोपरखळी देत त्यांनी नाराजी व्यक्त केली; पण अफसर शेख यांच्यावरील प्रेम कधीच कमी होऊ दिले नाही. "अफसर हा मोकळ्या मनाचा, माझा आवडता कार्यकर्ता" असे ते उघड बोलत असत..कामगिरीचा त्यांना अभिमान असायचा…सलग दोन वेळा अफसर शेख यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसने औसा पालिकेवर आपली सत्ता प्रस्थापित केली. समोर दिग्गज असतानाही अफसर शेख यांनी मारलेल्या बाजीवर अजित दादा नेहमी खूश असायचे. एखाद्या आमदाराने किंवा मंत्र्याने औशाची तक्रार केल्यावर, लटक्या रागात दादा म्हणायचे—"जिल्ह्यात माझी एकच नगरपालिका आहे… त्याला सांभाळून घ्या."म्हणत ते अफसर शेख यांची बाजू लावून धरायचे..नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीने २३ पैकी १७ नगरसेवक आणि नगराध्यक्षपद जिंकून एकहाती सत्ता स्थापन केली. विजयी उमेदवारांना भेटीदरम्यान त्यांनी—"काही चिंता करू नका, मी तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही'.- असा शब्द दिला होता..मात्र नियतीला वेगळेच मान्य होते. दादांच्या जाण्याने औसेकरांचे मोठे नुकसान झाले आहे. खासकरून शेख कुटुंबावर जिवापाड प्रेम करणारा आणि कोणत्याही प्रसंगात त्यांच्या पाठीशी भक्कम उभा राहणारा बंधुसमान नेता औशाने गमावला आहे. औशाच्या विकासाला "काही कमी पडू देणार नाही" असा शब्द देणारा दादा—तो माणूस औशाने गमावल्याचे दुःख औसेकरांच्या मनाला चटका लावून गेले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.