खरंच साप ‘डुक’ धरतो ?

नवनाथ येवले
शनिवार, 7 डिसेंबर 2019

0- साप म्हंटले की भल्याभल्यांची बोबडी वळते
0- सापाबद्दल समज व गैरसमज अनेक आहेत
0- साप मागावर येतो हा केवळ गैरसमज
0- साप हा अत्यंत भित्रा सरपटणारा प्राणी 

नांदेड : साप हा प्रकार माणसाच्या मनात इतक्या खोलवर भिती निर्माण करून बसला आहे की, एखाद्या व्यक्तीला सहजपणे फार कठीण होते. याचे मुख्य कारण म्हणजे पुर्वी दवाखाने, हॉस्पीटल व डॉक्टर उपलब्ध नव्हते. जंगलं मोठी व घनदाट होती. रस्ते व पायवाटा तितक्याशा उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे वन्यजीवांची प्रामुख्याने सापांच्या हालचाली जास्त होत होत्या. अशात सर्पदंशामुळे उपचाराअभावी माणसांचे मृत्यू झाले असावेत. त्यामुळे गैरसमजूतीतून सापाला मारायला सुरवात झाली असावी. पण भक्षाच्या शोधात सरपटणारा साप मिलन काळात एकत्रीत राहत असला तरी तो भित्रा प्राणी आहे. साप डूक धरतो, मागावर येतो हा केवळ गैरसमज आहे. 

भारतामध्ये २७८ जातीचे साप 

भारतामध्ये २७८ जातीचे साप सापडतात. यापैकी फक्त ७२ सापाच्या जाती विषारी आहेत. महाराष्ट्रामध्ये ५२ जातीचे साप सापडतात त्यापैकी फक्त १० सापच विषारी आहेत. या १० सापांपैकी मानवाचा फक्त चार विषारी सापांसोबत सामना होतो. बाकीचे सहा साप दूर्मिळ असून त्यातील दोन साप राज्याच्या समुद्रकिनारी तर चार साप सह्याद्री पर्वतात सापडतात. पावसाळ्यामध्ये उंदिर, बेडूक, सरडे, पाली अशा प्राण्यांची संख्या व हालचाली वाढतात व हे प्राणी आपल्या घराजवळ येण्याची शक्यता असते. परिणामी साप या भक्ष्यावर आकर्षित होऊन आपल्या घरापर्यंत येतात. महाराष्ट्रामध्ये आढळणारे ५२ जातीच्या सापांपैकी ४२ साप बिनविषारी आहेत. या सापांमधील काही दुर्मिळ जातीचे साप जे दिसायला काहिसे विषारी सापांसारखे असतात. असे साप आपल्या घराजवळ येऊ शकतात. पण हे साप बिनविषारी असून या सापांपासून मानवाला काही अपाय नसतो. पण "सापांबद्दलची अनुवांशिक भिती, शास्त्रीय अज्ञान व माहितीचा अभाव" यामुळे लोक दिसेल तो साप मारून टाकतात. 

साप डूक धरत नाही:  

मार्च, एप्रिल, मे या महिन्यांमध्ये रूका, नानेटी, धामण या सापांचा मिलनाचा काळ असतो तर धामणचे लढाईचे दृश्यही सहज नजरेस पडतात. या काळात मादीच्या शरीरातून एक प्रकारचा द्रव निघत असतो. या द्रवाच्या वासावर नर आकर्षीत होतात व मादी ज्या ठिकाणी जाईल तिच्या मागावर नर जातात. अशी मादी जर एखाद्या घराच्या आसपास पोहोचली तर तिच्या मागावर नर तिथपर्यंत पोहोचतात. हे साप लोकांच्या हालचाली पाहून जिथे जागा मिळेल तिथे लपतात. 

साप मागावर येत नाही

सापाला मारण्याची काहीच गरज नसते, कारण साप कधीच मानवाला उगाच चावत नाही किंवा डूक धरत नाही किंवा मागावरही येत नाही. कारण सापांच्या मेंदूचा विकास झालेला नाही त्यामुळे त्यांच्या स्मरणात काहीच राहत नाही. त्यामुळे साप मागावर येण्याचा संबंधच नाही. 

साप व्यक्ती ओळखू शकत नाही:

सापांना सहा फूटापलीकडे अंधूक दिसते. त्यामुळे साप व्यक्ती ओळखू शकत नाही. मग साप डूक धरण्याचे कारणच नाही. यातही आता गावोगावी दवाखाने, हॉस्पीटल झाले आहेत. प्रत्येक गावांमध्ये सर्पमित्र तयार झाले आहेत. त्यामुळे सापांपासून घाबरण्याचे कारण राहिलेले नाही. सापांबद्दलची माहिती आता डॉक्युमेंटरी, पुस्तके, जनजागृती कार्यक्रम, बॅनर्स, पोस्टर्सद्वारे दिली जाते. यामुळे साप तितका भयावह प्राणी राहिलेला नाही. प्रत्येक माणसाने सापांना जाणून घेऊन त्यांची शास्त्रीय माहिती वाचली तर साप किती शांत व भित्रा प्राणी आहे हे लक्षात येते.

डूक धरणे हा गैरसमजच:
 
सापांबद्दलच्या अंधश्रद्धा, गैरसमज, शास्त्रीय माहितीचा अभाव, अज्ञान आणि भितीमुळे सर्पहत्या होते. पण काही वेळेस सापाला इतक्या भयानक परिस्थीतीला सामोरे जावे लागते जी परिस्थीती मरणापेक्षा जास्त त्रासदायक असते. जर साप घरात, घराजवळील बिळात किंवा अशा काही ठिकाणी लपून राहतो ज्यातून मानव त्या सापाला बाहेर नाही काढू शकत. जर साप बाहेर नाही आला तर साप रात्री बाहेर पडेल आणि घरात घुसून दंश करेल, सापाने डूक धरले असेल म्हणून तो बाहेर पडत नाही, साप कुणाच्यातरी मागावर आला आहे त्यामुळे तो लपल्याच्या शंका गैरसमज ठरतात. 

मुळात साप हा भित्रा प्राणी आहे

मिलन काळात एखाद्या मादी सापाला मारुण ज्या काठीने मारले त्या काठीसहीत त्याला आसपास फेकून दिले जाते. त्या काठीला लागलेल्या मिलन काळातील गंधाकडे त्या जातीचे साप आकर्षीत होतात. मारलेल्या सापाप्रमाणे हुबेहुब दिसणाऱ्या इतर सापामुळे डुख धरल्याचा गैरसमज पसरतो. मुळात साप हा भित्रा प्राणी आहे, त्यामुळे त्यास मारण्याचे कारण नाही. 
सिद्धार्थ सोनवणे ,संचालक, सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र, बीड.
 
  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Does a snake actually hold a 'duck'?