'आत्महत्येचा विचार करू नका, मदतीसाठी सेनेला हाक द्या'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

जन आशीर्वाद यात्रेदरम्यान शेतकऱ्यांची निवेदने स्‍वीकारून संपूर्ण अभ्यास करून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती करणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

जालना : यंदाही दुष्काळ राहिलाच, तर जीवाचे बरे-वाईट करण्याचा विचार करू नका. शिवसेनेला हाक द्या. आम्ही तुमची मदत करू, असे आवाहन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. जन आशीर्वाद यात्रेनिमित्त ते आज (शनिवार) जालना येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होते.

सरकारने केलेली कर्जमाफी सर्व पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोचलेली नाही. जन आशीर्वाद यात्रेतून शेतकऱ्यांची निवेदने स्‍वीकारून संपूर्ण अभ्यास करून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती करणार असल्याचे ठाकरे यांनी यावेळी सांगितले. राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकविम्याच्या प्रश्‍नासाठी मुंबईत सेनेने काढलेल्या मोर्चानंतर वीमा कंपनीने दहा लाख शेतकऱ्यांना 960 कोटींची नुकसान भरपाई दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

शिवसेनेची जन आशीर्वाद यात्रा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काढण्यात आली नसून राज्यातील शेतकरी, मजूर, बेरोजगारांसह आदी घटकांचे प्रश्‍न जाणून घेऊन नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. त्यासाठी ही यात्रा काढण्यात आल्याचे आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

या मेळाव्यास राज्यमंत्री अर्जुन खोतकर, रविंद्र वायकर, संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरूद्ध खोतकर, उपनेते लक्ष्मण वडले, अभिमन्यू खोतकर आदींची उपस्थिती होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dont attempt suicide call the Shivsena for help says Aditya Thackeray