कोरोनाला घाबरू नका, काळजी घ्या ! लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 मार्च 2020

कोरोना विषाणूच्या साथीबाबत जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. याला सोशल मीडिया कारणीभूत असून त्यावरूनच अफवा पसरत आहेत. लोकांनी सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवू नये. अधिकृत यंत्रणांनी दिलेल्या माहितीवरच विश्वास ठेवावा. कोरोनाचा प्रसार महाराष्ट्रात झालेला नाही. जिल्ह्यात रोगाचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा सज्ज आहे. लोकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी शुक्रवारी (ता.सहा) पत्रकार परिषदेत केले.

लातूर : कोरोना विषाणूच्या साथीबाबत जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. याला सोशल मीडिया कारणीभूत असून त्यावरूनच अफवा पसरत आहेत. लोकांनी सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवू नये. अधिकृत यंत्रणांनी दिलेल्या माहितीवरच विश्वास ठेवावा. कोरोनाचा प्रसार महाराष्ट्रात झालेला नाही. जिल्ह्यात रोगाचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा सज्ज आहे. लोकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी शुक्रवारी (ता.सहा) पत्रकार परिषदेत केले.

आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, आयएमएचे अध्यक्ष डॉ. अजय जाधव, सचिव डॉ. संतोष डोपे, डॉ. अमोल गायकवाड आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीकांत म्हणाले, कोरोना साथीबाबत शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांत जनजागृती करण्याचे आदेश दिले आहेत. अफवेमुळे लोकांत संभ्रम निर्माण होत आहे. सोशल मीडियावरून खोडसाळपणाने अफवा पसरवल्या जात आहेत. यु ट्युबवरील तथाकथित वाहिन्यांवरही चुकीचा प्रसार केला जात आहे. चुकीच्या बातम्या तसेच संदेश देऊन लोकांत संभ्रम निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. कोरोनाबाबत जागृती करण्यासाठी प्रसार माध्यमांनी प्रत्यक्ष सहभाग देण्याची गरज आहे.

वाचा ः लातुरमध्ये चोरट्यांनी पहाटे दोन हॉटेल, एक दुकान फोडले

जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. मोनिका पाटील यांनी सादरीकरणातून कोरोनाची माहिती दिली. कोरोनाचा चीनमधून अन्य देशात झालेला प्रवास सांगत त्यांनी जिल्ह्यात कोरोनाला आटोक्यात ठेवण्यासाठी केलेल्या सुविधांची माहिती दिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्वतंत्र कक्षासोबत उदगीर व निलंगा उपजिल्हा रूग्णालय तसेच ग्रामीण रूग्णालयांतही सुविधा उपलब्ध ठेवल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाची लक्षणे सामान्य असल्याने प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच त्याची लागण झाल्याबाबत खात्री करण्यात होते. यापूर्वीही सात प्रकारचा कोरोना विषाणू येऊन गेला. सध्याचा विषाणू नवीन असल्याने त्याला नॉवेल कोरोना असे म्हटले जात आहे. चार अंश सेल्सियसपेक्षा जास्त तापमानात कोरोनाचा विषाणू जीवंत राहत नाही. राज्यात वाढलेले तापमान जमेची बाजू असल्याचे डॉ. परगे यांनी सांगितले. चीनमधून जिल्ह्यात दोन विद्यार्थी आले असून त्यांच्या आवश्यक त्या तपासण्या केल्यानंतर त्यांना या रोगाची लागण झाली नसल्याचे जाहिर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

सर्वांनाच मास्कची गरज नाही
कोरोनाच्या भीतीमुळे मास्कचा वापर वाढला असून मास्कचे भावही गगनाला भिडले आहेत. या स्थितीत सर्वांनाच मास्कची गरज नसल्याचे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितले. रूग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, कर्मचारी तसेच रूग्णांच्या सहवासात येणाऱ्यांना मास्कची गरज आहे. सामान्य नागरिकांनी मास्क लावण्याची गरज नाही. काळजी म्हणून कोणी मास्क वापरत असेल तर त्याला विरोध करता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Don't Fear Coronavirus, Be Alert, Latur District Collector Appeal