Breaking : हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांमध्ये दुहेरी चिंता, सकाळी पुन्हा जमिनीतून आवाज

राजेश दारव्हेकर
Tuesday, 2 June 2020

हिंगोली जिल्ह्यात जमिनीतून येणारे गुढ आवाज थांबायचे नाव घेत नाहीत. मंगळवारी सकाळी पुन्हा वसमत, कळमनुरी तालुक्यांत जमिनीतून गुढ आवाज आल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. 

हिंगोली : कोरोना विषाणूच्या दहशतीसोबतच जिल्ह्यातील नागरिकांमध्ये जमिनीतून येणाऱ्या गुढ आवाजाचीही दहशत निर्माण झाली आहे. मंगळवारी (ता.दोन जून) सकाळी सात वाजता जिल्ह्यातील अनेक गावांत जमिनीतून एकापाठोपाठ एक दोन आवाज झाल्याने नागरिक रस्त्यावर आले होते.

मंगळवारी सकाळी सात वाजता जमिनीतून एकापाठोपाठ एक दोन आवाज आले. भूकंपाच्या भीतीमुळे नागरिक रस्त्यावर आले.  सतत होत असलेल्या या आवाजाने नागरिकांमध्ये कोरोना विषाणूसोबतच भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत माहिती अशी की, वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे सकाळी सात वाजता जमिनीतून गूढ आवाज आला.  हे आवाज पांगरा शिंदे गावासह वापटी, कुपटी, सिरळी, खापरखेडा आदी गावात आले. 

हेही वाचा - Hingoli Breaking ; सतरा वर्षीय युवक, बारा वर्षीय मुलगी पॉझिटिव्ह
 

तसेच कळमनुरी तालुक्यातील पोतरा, सिंदगी, जांब, कवडा, निमटोक, पेठवडगाव, बोल्डा, येहळेगाव गवळी, असोला, हारवाडी, सापळी आदी गावांतही जमिनीतून येणाऱ्या गुढ आवाजाने नागरिकांची झोप उडाली आहे. या आवाजाने गावकरी घराच्या बाहेर आले असून गुढ आवाजाची भिती नागरिकांमध्ये निर्माण झाले आहे.
    
दरम्यान पांगरा शिंदे, पोतरा व सिंदगी येथे मागच्या काही दिवसांपासून जमिनीतून गुढ आवाज सातत्याने येत आहेत. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे मागच्या काही वर्षांपासून गुढ आवाजाची मालिका सुरू आहे. मात्र त्याचे गुढ अद्यापही उकलले नाही. या गावात आवाज आल्यावर वसमत तालुक्यासह औंढा व कळमनुरी गावातील अनेक गावात हा आवाज येत आहे. या बाबत गावकऱ्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला वारंवार कळविले आहे. 

हे देखील वाचायलाच हवे Good News ; हिंगोलीत कोरोना तपासणी लॅब, ट्रू नेट मशीन होणार उपलब्ध
 

दोन वर्षांपूर्वी येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील पथकाने भेट देऊन पाहणी केली होती.  मात्र,  आवाजाच्या गुढ बद्दल काही सांगितले नाही. त्यामुळे आतातरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन आवाजाचे गुढ उकलावे, अशी मागणी या गावातील गावकऱ्यांतून होत आहे. दरम्यान सलग तीन आवाजाने गावकऱ्यांच्या झोपा उडाल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Double Concern Among The Citizens Of Hingoli district Hingoli News