esakal | एकाच घरात दोनदा चोरी
sakal

बोलून बातमी शोधा

प्रतिकात्मक छायाचित्र

चोरट्यांनी आधी 14, आता चार लाख पळविले 

एकाच घरात दोनदा चोरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लातूरः एकाच महिन्यात आणि एकाच घरात दोनदा चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी या घरातून आधी तब्बल 14 लाख आणि आता चार लाख रुपयांचा ऐवज पळविला आहे. या घटनेमुळे शहरात आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. अशा वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 


शहरातील औसा रस्त्यावरील आदर्श कॉलनी भागात सूर्यभान ऊर्फ बाबूराव गणपतराव शिंदे-पाटील (वय 61) यांचे सूर्यनग नावाचे घर आहे. पाटील हे कुटुंबासह बाहेर गेले होते. घराला कुलूप पाहून चोरट्यांनी डाव साधला. कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील 2 लाख 49 हजार रुपयांचे आठ तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि रोख एक लाख 55 हजार रुपये असा एकूण 4 लाख 4 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळवून नेला. ही घटना शुक्रवारी (ता. 23) सायंकाळी घडली. 


याआधी केवळ 25 दिवसांपूर्वी याच घरातून चोरट्यांनी तब्बल 14 लाख 30 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. घरातील सर्व व्यक्ती बाहेरगावी गेल्याचे पाहून चोरट्यांनी घरातून पैसे आणि दागिने पळवून नेले होते.

या घटनेचा तपास अद्याप लागला नाही. तोच आणखी एक प्रकार याच घरात झाल्याचे पाहून आश्‍चर्य व्यक्त केले आहे. ही घटना घडताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. घराच्या परिसरातील सीसीटीव्हीत चोरट्यांची छबी कैद झाली आहे का, हे तपासले जात आहे. पोलिस निरीक्षक नानासाहेब लाकाळ हे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.  

loading image
go to top