दुष्काळाने घेतला फळबागांचा घास

तुकाराम शिंदे
गुरुवार, 25 एप्रिल 2019

गेल्या दहा वर्षांपूर्वीची दोन एकरांतील मोसंबीची बाग पाण्याअभावी तोडण्याची वेळ आली आहे. भायगव्हाण हे गाव अवर्षणप्रवण गाव आहे. त्यामुळे या ठिकाणी बाग जगविण्याचा खूप प्रयत्न केला; परंतु पाणी उपलब्ध होत नसल्याने अखेर उभ्या बागेवर कुऱ्हाड चालवावी लागली.
- घनश्‍याम कोरडे, शेतकरी, भायगव्हाण

तीर्थपुरी - यंदा सर्वाधिक दुष्काळाच्या झळा अधिक बसत असल्याने शेती व्यवसाय अडचणीत आला. पिण्याच्या पाण्यासह पशुधनाच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. दिवसेंदिवस पाणीपातळी खोलवर जात असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. अगदी फळधारणा झालेल्या बागा पाण्याअभावी जळत आहेत. दुष्काळामुळे अंबड- घनसावंगी तालुक्‍यातील मोसंबीचा आगर पुन्हा नष्ट होणार असल्याचे चिन्हे दिसत आहे.

जालना जिल्ह्यातील अंबड- घनसावंगी तालुका मोसंबीचा आगर म्हणून ओळखला जातो. गेल्या काही वर्षांपासून दुष्काळ पडत असल्याने शेतकऱ्यांनी लेकराप्रमाणे जतन केलेल्या मोसंबीच्या बागा यंदाच्या दुष्काळात नष्ट होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या तालुक्‍यातील हजारो एकरांवरील मोसंबीच्या बागा पाण्याअभावी संकटात आल्या आहेत. शेतकरी मिळेल त्या ठिकाणाहून पाणी आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.  पाणीपातळी दिवसेंदिवस खोलवर जात असल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे. पिण्यालाच पाणी नाही तर बागेला कोठून द्यायचे अशी विदारक स्थिती आहे.

विहिरीत पाणी आल्यावर उपसा 
गतवर्षी पाऊस पडला नव्हता. विहिरी व बोअरवेलच्या जेमतेम पाण्यावर मोसंबीच्या बागा जगविण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला. आता पाणी अचानक कमी झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. विहीर व बोअरवेलमध्ये दिवसभरात एखाददुसऱ्या झऱ्यामुळे थोडेबहुत पाणी येण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना करावी लागते. मग हे जेमतेम पाणी बागेला देण्यात येत आहे. दोन महिने बागेला विकत पाणी घालणे शक्‍य नसल्याने शेतकरी चिंतेत आहे.

वर्ष २०१२ च्या दुष्काळात दहा वर्षांची मोसंबीची फळधारणा झालेली तीन एकरांची बाग नष्ट झाली. या दुष्काळात सावरून पुन्हा चार एकरांवर फळझाडांची लागवड केली. या बागेच्या आंबिया बहराचे नियोजन आणि विहिरीचे पाणी कमी झाल्याने बाग जगविण्याची चिंता निर्माण झाली आहे. टॅंकरने पाणी घालण्याची वेळ आली असून, पाणी कुठून आणावे ही चिंता लागली आहे. लेकराप्रमाणे बाग जतन केली, ती आता पाण्याअभावी जळणार असल्याने मनाला वेदना होत आहेत.
- सुनील औताडे, डोंगरवाडी वस्ती, खालापुरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drought Horticulture Water Shortage Loss