सावरावं कसं हेच कळत नाय

सुषेन जाधव
बुधवार, 15 मे 2019

तीन-चार मित्रांसह गावात समुपदेशन करतो. त्यामुळे आतापर्यंत चार-पाच जणांची आत्महत्या रोखण्यात यश आले. शक्‍यतो टोकाचा विचार करणारे लोक सहजासहजी कळत नाहीत; मात्र आम्ही एका गावातले असल्याने पाहिलं, समजून घेतलं तरी त्यांच्या मनातील भावनांचे पदर उलगडतात.
- अरुण मोरे, कारी

कारी (ता. धारूर) - २०१२ पासूनच्या दुष्काळानी वाढच किली, आता सावरावं कसं हेच कळत नाय, अशा शब्दांत बीड जिल्ह्यातील कारी (ता. धारूर) येथील ७५ वर्षांच्या मारोतराव मोरे यांनी दुष्काळाच्या दहाकतेविषयी सांगितले. गावात ग्रामस्थांना पाणी विकतच घ्यावं लागत आहे. बारमाही वाहणाऱ्या नदीचा उपसा वाढला, नदी आटली, हाब्रीडच्या नादात जुनी पिकंबी गेली. खर्च वाढला तसा शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरचे बोजे वाढले अन्‌ सगळं संपलं. मग व्हायला लागल्या आत्महत्या, अशी शेतकरी आत्महत्येची कारणे त्यांनी दिली.

या भागात पिवळी भेंडी, बाजरी, ज्वारी ही पिकं घेतली जायची आणि रब्बी हंगामासाठी शेतं रिकामी ठेवली जायची. नगदी पीक म्हणून गावरान कापूस, सूर्यफूल घेतलं जात असे; मात्र बियाणे कंपन्यांचे कॉन्व्हर्जन्स झाले आणि २००० मध्ये सूर्यफूल बंदच झालं. ‘महेंद्र’ हे वाण बंद झालं. केवळ तीन महिन्यांत पैसे कमवून देणारं हे पीक बुडालं आणि इथंच ग्रामीण अर्थकारणाला खीळ बसल्याचं ग्रामस्थांनी सांगितले. 

एकरी पाच ते सहा क्विंटल सूर्यफूल होत असे. महादेव मोरेंना १२ एकरांत ९५ पोती (५० क्विंटल) उत्पादन मिळाले होते. हजार ते बाराशे रुपये भाव होता; तसेच उत्पादनखर्चही कमी होता. रानडुकरांच्या त्रासामुळे या भागातील भुईमूग पीकच बुडाले. त्यामुळे शेतकरी असून शेंगदाणे विकत घ्यायची वेळ आली आहे. महादेव सांगत होते गाव परिसरात २५ हजारांवर रानडुकरं आहेत. पाच एकरवाला शेतकरी असेल तर तो पाचही एकर कापूस लावतो, कारण कपाशीच्या तुलनेत इतर पिकं परवडत नाहीत. एक तर उत्पादनखर्च न परवडणारा आहे आणि धान्य खाण्यासाठी विकत घेतलेलं परवडतं. या गावच्या परिसरात उसाचे चांगले उत्पादन घेतले जात होते; पण आता प्यायच्या पाण्याचीबी अडचण आहे, गावात चार टॅंकर येतात असे मारोतराव यांनी सांगितले.  

एका आत्महत्येनं इतकं केलं
मारोतराव सांगत होते, रघुनाथ मारुती मोरे यांची गावातली पहिली आत्महत्या. उत्तम शेषराव मोरे यांनी १९९६ मध्ये आत्महत्या केली. त्यांच्या पत्नी भीमाबाई मोरे यांनी २०१७ ला तोच मार्ग पत्कारला. जगण्यासाठी त्यांच्या दोन मुलांनी गाव सोडलं. तीन मुलींपकी एका अपंग मुलीचा मृत्यू झाला. उत्तम यांनी आत्महत्या केली तेव्हा मुलींची लग्नेही झाली नव्हती.

समुपदेशनाची गरज 
आर्थिक गरजा वाढल्या, चणचण वाढली की शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करतात. त्यामुळे अशा स्थितीत समुपदेशन केंद्रांची खूप गरज आहे. कोणतीही योजना अली की ती आत्महत्या केलेल्यांकडे जाते. याशिवाय एखादा आजार असला की लोकं आत्महत्या करतात. आपण मुलींची लग्ने करू शकले नाहीत, मुलांना शिकवू शकलो नाही, घर बंधू शकलो नाही म्हणून आपण आत्महत्या केली तर मिळणाऱ्या मदतीतून या गरजा भागतील त्यामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढले असल्याचे ग्रामस्थ सांगत होते. 

दिलासा संस्थेनं २०१६ मध्ये २५-२५ फुटांवर गॅप देत नदीचे खोलीकरण, रुंदीकरण केले; पण तांत्रिकदृष्ट्या ते जमलं नाही. पावसाच्या पाण्यात पूर्णच नदी वाहून गेलीय. 
- महादेव मोरे, कारी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drought Water Shortage Life Agriculture