जलसंधारणामुळे दुष्काळी गावातील बहरल्या फळबागा 

राजाभाऊ नगरकर
Sunday, 5 April 2020

उन्हाळ्याची चाहूल लागली की, शेतीसाठी काय गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई कायमच पाचविला पुजलेली. पण, आज जांब-खुर्द (ता.जिंतूर, जि.परभणी) या गावाची परिस्थिती बदलली आहे. 

जिंतूर (जि.परभणी) : उन्हाळ्याची चाहूल लागली की, शेतीसाठीच काय पण पिण्याच्या पाण्यासाठी ग्रमस्थांना उन्हाचे चटके सहन करत भटकंती करावी लागत असलेल्या जांब-खूर्द (ता.जिंतूर) चे चित्र आता बदलले आहे. वाॅटर कपच्या माध्यमातून झालेल्या जलसंधारणाच्या कामामुळे यावर्षी मुबलक पाणी उपलब्ध आहे. शेतशिवार फळबागांनी बहरले आहे.

जांब-खूर्द हे जिंतूर तालुक्यातील छोटसं गाव आहे. सुमारे साडेपाचशे लोकसंख्या असलेल्या या गावात कुटुंब संख्या १२३ असून दोन-चार कुटुंब सोडले तर जवळपास सर्वच कुटुंब शेतीवर अवलंबून आहेत. परंतु लागवडीयोग्य जमिनीचे क्षेत्र फक्त ५२० हेक्टर आहे. तीदेखील कोरडवाहू आहे. गाव परिसरात पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने फळबागांचा प्रश्नच नाही. त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागली की, शेतीसाठी काय गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई कायमच पाचविला पुजलेली. पण, आज जांब-खुर्द या गावाची परिस्थिती बदलली आहे. २०१८ व २०१९ या दोन वर्षांत गावकऱ्यांनी अफाट मेहनतीने वाॅटर कपच्या माध्यमातून जलसंधारणाची विविध कामे केली आहेत.

हेही वाचा - घरपोच भाजीपाला विक्रीला प्रतिसाद
सरपंच पंडित जाधव आणि ग्रामसेविका विद्या गायकवाड यांच्या पुढाकाराने सुभाष पिंपळकर व अन्य धडाडीच्या तरूणांच्या सहकार्याने गावशिवारात शेततळे, नाला खोलीकरण व इतर याप्रमाणे ११५०० घनमीटर पाणी साठवण क्षमतेची जलसंधारणाची कामे केली. याबद्दल वॉटरकप स्पर्धेत तालुकापातळीवरील प्रथम पुरस्कार ग्रामपंचायतला प्राप्त झाला. गावाला पाणीदार जांब खुर्द अशी ओळख मिळाली. ग्रामस्थांना पाण्याचे महत्व पटले असून पिकांना पाणी देताना ठीबक आणि तुषार या तंत्राचा वापर करतात.

हेही वाचा - करडई संशोधन प्रकल्पास मंजुरी

दहा हजार वृक्ष लागवड...
सामाजिक वनिकरण विभागागाच्या मदतीने गाव रिसरतील गायरान जमिनीवर स्थानिक वृक्ष जातींसोबत विविध प्रकारच्या उपयुक्त फळरोपांची मिळून दहा हजार वृक्ष लागवड करण्यात आली.

चाळीस क्विंटल पर्यंत हळदीचे उत्पादन
यावर्षी दीड एकर हळद लागवड केली. पिकासाठी शेवटपर्यंत पाणी मिळाल्यास चाळीस क्विंटल पर्यंत हळदीचे उत्पादन पदरात पडण्याची आशा आहे.
-रंगनाथ चव्हाण, शेतकरी
 

गावशिवार कायम दुष्काळमुक्त 
गावकऱ्यांनी वाॅटरकपच्या स्पर्धेत सलग दोन वर्ष सहभाग घेतला. यातून गावशिवार कायम दुष्काळमुक्त झाला. गावाला जिल्हायात वेगळी ओळख मिळाली. जिथे जातो तिथे वेगळा सन्मान मिळतो.
-पंडित जाधव, सरपंच
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to water conservation, many orchards in drought-prone villages,parbhani news