वॉटरग्रीडमुळे लातूर कायमस्वरूपी टंचाईमुक्त होईल - निलंगेकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

संपूर्ण मराठवाडा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी शासनाने मराठवाडा वॉटरग्रीड योजनेला मान्यता दिलेली आहे. यात लातूर जिल्ह्याचा समावेश आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात लातूर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याला पाणी उपलब्ध होणार आहे. या योजनेमुळे लातूर जिल्हा कायमस्वरूपी टंचाईमुक्त होईल, असा विश्वास अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, कौशल्य विकास व माजी सैनिक कल्याणमंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी येथे व्यक्त केला. 

लातूर ः संपूर्ण मराठवाडा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी शासनाने मराठवाडा वॉटरग्रीड योजनेला मान्यता दिलेली आहे. यात लातूर जिल्ह्याचा समावेश आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात लातूर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याला पाणी उपलब्ध होणार आहे. या योजनेमुळे लातूर जिल्हा कायमस्वरूपी टंचाईमुक्त होईल, असा विश्वास अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, कौशल्य विकास व माजी सैनिक कल्याणमंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी येथे व्यक्त केला. 

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मंगळवारी (ता. 17) श्री. निलंगेकर यांनी स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन झाले. यावेळी पोलिसांनी हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली. यावेळी महापौर सुरेश पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष 
मिलिंद लातुरे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, महापालिका आयुक्त एम. डी. सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन ईटनकर, अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे उपस्थित होते. 

भारताला ता. 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले; परंतु हैद्राबाद, काश्‍मीर व जुनागढ संस्थानांतील जनता गुलामीतच होती. मराठवाडा निजामाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन छेडले गेले. त्यात उस्मानाबाद जिल्हा आघाडीवर होता.

लातूर जिल्ह्याचेही त्या लढ्यात मोठे योगदान राहिले. मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा लढा सतत 13 महिने सुरू होता आणि या लढ्यात अनेक वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. निजाम शरण येण्यास तयार नव्हता त्यावेळी भारत सरकारने पोलिस ऍक्‍शन सुरू केली आणि शेवटी ता. 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाला. या लढ्यामुळे भारतीय स्वातंत्र्याला खऱ्या 
अर्थाने पूर्णत्व प्राप्त झाले. सध्या मराठवाड्याची लातूर जिल्ह्यासह सर्वांगीण विकासाकडे वाटचाल सुरू आहे. या विकासाला मराठवाडा मुक्तिसंग्रामातील थोर हुतात्म्यांच्या बलिदानाची ऊर्जा लाभली आहे, असे ते म्हणाले. 

यावेळी पालकमंत्री निलंगेकर यांच्या हस्ते गणेश विसर्जनाच्या कामात उत्कृष्ट काम करून पर्यावरण संरक्षणासाठी महत्त्वाची भूमिका बजावून लातूरचा एक वेगळा पॅटर्न निर्माण करणाऱ्या जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, आयुक्त एम. डी. सिंह, अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे, मनपा उपायुक्त संभाजी वाघमारे यांचा गौरव करण्यात आला.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to the water grid, Latur will be permanently free from scarcity