आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्तीसाठी धडपडणारी जि.प. शाळा : video

Zilla Parishad School , Aurangabad
Zilla Parishad School , Aurangabad

औरंगाबाद-  आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करण्यासाठी दोन महिन्यांत कायापालट करणाऱ्या पोखरी (ता. वैजापूर) येथील जिल्हा परिषद शाळेची चर्चा सध्या राज्यभर सुरू आहे. यासाठी गावकऱ्यांनी अगदी कमी काळात लोकसहभागातून साडेसहा लाख रुपये जमा करून संपूर्ण शाळेचे रूपडेच पालटून टाकले. याबाबत माहिती देताना शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांनी सांगितले, की एकदा पोखरीतील मित्राच्या वडिलांचे निधन झाल्याने भेटीसाठी गेलो होतो.

शिक्षण विभागातील अधिकारी गावात आल्याचे समजताच काही मंडळी भेटीसाठी आली. त्यांनी आमच्या गावातील शाळा आंतरराष्ट्रीय करायची असल्याचे सांगितले. शाळेच्या चार-पाच खोल्या एका बाजूला, मध्येच 30 फुटांचा रस्ता आणि दुसऱ्या बाजूला शाळेच्या आणखी दोन खोल्या असल्यामुळे शाळा आंतरराष्ट्रीय करणे अवघड असल्याचे त्यांना सांगितले. परंतु, गावकऱ्यांनी आग्रह धरल्याने त्यांची समजूत काढण्यासाठी पुणे जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाची वाबळेवाडीची शाळा पाहून या मग ठरवू असे सांगून वेळ मारून नेली.

 
मात्र, तेथील ग्रामस्थांचा निर्धार पक्का होता. अवघ्या काही दिवसांतच पुन्हा पोखरीतील बाळासाहेब भोसले या ग्रामस्थाचा फोन आला. त्यांनी सांगितले, "साहेब, आम्ही वाबळेवाडीची शाळा पाहून आलो. आम्हीही आमच्या परीने गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेचा कायापालट केला आहे. गावात दोन परस्परविरोधी कट्टर गट होते. या उपक्रमामुळे ते दोन्ही गट एकत्र आले असून, शाळेच्या मधून जाणारा रस्ताही दुसऱ्या बाजूने नेला आहे. गावातील अंगणवाडी शाळेत आणली. सर्व शाळेची रंगरंगोटी केली. पन्नास इंचाचा एलईडी बसवला. गावातील बीएससी झालेल्या मुलीला अंगणवाडीसाठी मानधन तत्त्वावर नियुक्त केले. बारा हजार खर्चून शंभर झाडे लावण्यात आली.

पालकांचा व्हॉट्‌सऍप ग्रुप केला असून, 58 दिवसांत हा कायापालट गावकऱ्यांच्या सहकार्याने शाळेत झाला आहे. दोन महिन्यांत गावकऱ्यांनी साडेसहा लाखांपेक्षा अधिक खर्च केल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच पोखरीतही वाबळेवाडीप्रमाणे जि.प. शाळा उभी राहील, असा विश्वास जयस्वाल यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. 


सर्वांसाठी आदर्श 
पोखरी या गावात दोन गट असल्याने डिजिटल शाळा करणे अशक्‍य वाटत होते; परंतु केवळ मुलांच्या शिक्षणासाठी परस्परविरोधी गट एकत्र आल्याने गावाचा आणि शाळेचाही कायपालट झाला. हे सर्वांसाठी एक आदर्श असल्याचे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com