सेलूत ऑक्सिजनचे आठ बेड असतांना केवळ तज्ञ डॉक्टरांअभावी बंद

file photo
file photo

सेलू ( जिल्हा परभणी ) : कोरोनाच्या रुग्णांसाठी ऑक्सिजन बेडची आवश्यकता असतांना सेलूत गेल्या दोन ते तिन महिण्यांपासून ऑक्सिजनचे आठ बेड केवळ फिजिशियन डॉक्टर नसल्याने कार्यान्वित होऊ शकले नाहीत. तसेच सेलू शहरासह तालुक्यात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता सेलूकरांना धोक्याची घंटा असून शहरात असलेले दोन्ही कोविड सेंटर फुल झाले असल्याची परिस्थिती आहे.

सेलूत आॅक्सिजन बेड कार्यान्वित नसल्याने पर्यायाने रुग्णांना परभणी, औरंगाबादला जाण्याशिवाय पर्याय उपलब्ध नसल्याने रुग्णांचीही अडचण होत आहे. शहरात उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय हरबडे यांनी कोविड सेंटर बाबतीत अतिशय चांगले काम सुरु केले आहे. परंतु जिल्हा आरोग्य प्रशासन येथील अडचणींकडे दुर्लक्ष करित आहे की काय? असा प्रश्न उपस्थितीत होत आहे. शहरातील तहसिल रस्त्यावरिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे व मुलींच्या वसतिगृहात कोविड सेंटर सुरु आहे. दोन्ही ठिकाणी मिळून एकूण १२० बेड याठिकाणी उपलब्ध आहेत. परंतु कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता हे कोविड सेंटर फुल होत आहेत. बुधवारी (ता. सात) रोजी ११५ कोरोना रुग्णांची भरती आहे. शहरात कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय पन्नास बेड व अल्पसंख्यांक मुलींचे वसतिगृह येथे पन्नास बेड अशा दोन ठिकाणी शंभर जागा आरक्षित केलेल्या आहेत. परंतु मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने तेथेही कोरोना रुग्णांच्या बाबतीत समस्या निर्माण होवू शकतात.

कोविड सेंटर मध्येच मनुष्यबळाची कमतरता असल्याने आरोग्य प्रशासनाला कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. तसेच कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत असल्याने अनेक रुग्णांना परभणी येथे पाठवावे लागत आहे. परंतु येथिल कोविड सेंटरमध्ये आठ बेड तयार असतांना केवळ तज्ञ डॉक्टर नसल्याने हे बेड तसेच पडून आहेत. सेलू येथे ऑक्सिजनचे नऊ जम्बो सिलेंडर उपलब्ध असतांना केवळ डॉक्टर नसल्याने रुग्णांना याचा फायदा होत नसल्याने नागरिकांतून चिंता व्यक्त केली जात आहे. सद्य: परिस्थितीत कोरोनाचा प्रसार वाढत असतांना ऑक्सिजनची सर्व सुविधा उपलब्ध असतांना केवळ फिजिशियन डॉक्टर नसल्याने यंत्र पडून राहिलेले असल्याने रुग्ण मात्र हैराण होत आहेत. यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाने तातडीने फिजिशियन डॉक्टर उपलब्ध करुन द्यावेत त्यामुळे रुग्णांना मदत होऊ शकते. खासगी रुग्णालयात रुग्णांची लूट होत असल्याची अनेक प्रकरण समोर येत असतांना सेलूमध्ये अशा प्रकारे ऑक्सिजनची यंत्रणा उपलब्ध असतांना सुविधा मिळत नाही. येथिल उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना दर्जेदार सुविधा देण्यासोबत कोवीड सेंटर देखील दर्जेदारपणे सुरु असतांना जिल्हा आरोग्य प्रशासनाने मनुष्यबळ आणि डॉक्टर व कर्मचारी पुरवणे आवश्यक आहे. तसेच सेलू येथे दोन ते तीन महिन्यांपासून पडून असलेले ऑक्सिजन बेडसाठी तज्ञ डॉक्टर देऊन तातडीने कार्यान्वित करावेत अशीही मागणी जोर धरु लागली.

सद्य: परिस्थितीत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. नागरिकांनी देखिल कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी दिलेले नियम पाळणे आवश्यक आहे. येथिल उपजिल्हा रुग्णालयाला मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास बेड वाढवण्यात येतील.
- डॉ. संजय हरबडे, वैद्यकिय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, सेलू जि. परभणी

येथिल मोरया प्रतिष्ठान व उपजिल्हा रुग्णालयाच्या वतिने कोरोना या संसर्गजन्य काळात रक्तदान शिबिराचे आयोजन करुन १०१ रक्तपिशव्यांचे रक्तसंकलन करण्यात आले होते. तसेच १५ गरजू रुग्णांना किराणा सामानाची किट पुरविण्यात आली. कोरोना काळात नागरिकांना मानसिक आधार देण्याचे काम मोरया प्रतिष्ठानच्या वतिने करण्यात येत आहे.
- अभिजित राजुरकर, अध्यक्ष,मोरया प्रतिष्ठाण,सेलू

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com