esakal | उस्मानाबाद जिल्ह्यातील निवडणुकीचा अतिकालिक भत्ता कधी मिळणार?
sakal

बोलून बातमी शोधा

WhatsApp Image 2020-09-03 at 10.22.47

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिकालिक भत्ता मिळण्याची महसूल कर्मचाऱ्यांना आशा लागली आहे. यासाठी पाच कोटी ६६ लाख रुपयांचे अनुदान जिल्हास्तरावर प्राप्त झाले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील निवडणुकीचा अतिकालिक भत्ता कधी मिळणार?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद : विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिकालिक भत्ता मिळण्याची महसूल कर्मचाऱ्यांना आशा लागली आहे. यासाठी पाच कोटी ६६ लाख रुपयांचे अनुदान जिल्हास्तरावर प्राप्त झाले आहे. यातून हा भत्ता देण्याची मागणी महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. 


विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक कर्मचाऱ्यांना जास्तीचे काम करावे लागते. त्यामुळे निवडणूक विभागातून अशा कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना एक महिन्याची मूळ रक्कम ‘अतिकालिक भत्ता’ म्हणून दिली जाते. वर्ष २०१९ मध्ये लोकसभा तसेच विधानसभा निवडणूक झाली. मात्र आतापर्यंत कोणालाही ही रक्कम देण्यात आली नव्हती. त्यासंदर्भातील अनुदान जिल्हास्तरावर प्राप्त झाले नव्हते.

आरक्षणावरील उत्तरासाठी सरकारने मागितला वेळ

लोकसभा निवडणुकीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चार कोटी २५ लाख रुपयांची रक्कम प्राप्त झाली आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक कोटी ४१ लाख रुपयांची रक्कम प्राप्त झाली आहे. सध्या कंत्राटदारांची रक्कम देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यातून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हा अतिकालिक भत्ता देण्यात यावा, अशी मागणी महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष एम. एल. मैदपवाड, सचिव प्रमोद चंदनशिवे, उपाध्यक्ष शीतल माजलगावकर, राजेश भवाळ, रवी मोहिते आदींच्या निवेदनावर सह्या आहेत. 

सावळा गोंधळ थांबेल 
वर्ष २०१४ मध्ये लोकसभा तसेच विधानसभा निवडणूक झाली होती. याचेही अनुदान जिल्हास्तरावर प्राप्त झाले होते. विशेष म्हणजे शेजारी जिल्ह्यात हा भत्ता कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांना देण्यात आला. उस्मानाबाद जिल्ह्यात अधिकाऱ्यांना अतिकालिक भत्ता देण्यात आला; मात्र कर्मचाऱ्यांना या भत्त्याची रक्कम देण्याऐवजी निधी समर्पित करण्यात आला होता. दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भांडणामध्ये हा प्रकार झाला होता. त्यामुळे आतातरी ही रक्कम कर्मचाऱ्यांना मिळावी, अशी अपेक्षा आहे. 

(संपादन - गणेश पिटेकर)