परभणी जिल्ह्यात नगरपालिकेत विषय समिती सभापतींची निवड, पाथरीत नवे चेहरे

सकाळ वृतसेवा 
Wednesday, 20 January 2021

जिल्ह्यातील पाथरी, गंगाखेड, सेलू, मानवत, पूर्णा, जिंतूर येथे निवडीचा नगरपालिकेत विषय समिती सभापतींची निवड कार्यक्रम बुधवारी (ता.२०) पार पडला.

पाथरी ः पाथरी नगर परिषदेच्या विषय समितीच्या सभापतींच्या (ता.२०) बिनविरोध निवडी करण्यात आल्या. यात नवीन चेहऱ्याना संधी मिळाली आहे. तसेच जिल्ह्यातील गंगाखेड, सेलू, मानवत, पूर्णा, जिंतूर येथेही निवडीचा कार्यक्रम बुधवारी (ता.२०) पार पडला.

विविध समित्यांसाठी प्रत्येकी एक एक अर्ज 
नगर परिषदेच्या विषय समितीच्या सभापती निवडीसाठी बुधवारी विशेष सभा बोलावण्यात आली. बैठकीस पिठासीन अधिकारी म्हणुन उपजिल्हाधिकारी डॉ.अरुण जऱ्हाड यांनी तर सहाय्यक पिठासीन अधिकारी म्हणुन मुख्याधिकारी कारभारी दिवेकर यांनी काम पाहीले. सुरुवातीला नगराध्यक्षा मिनाताई निलेश भोरे या स्थायी समितीच्या पदसिध्द अध्यक्षा असल्याचे घोषित करण्यात आले. नंतर विषय समितीच्या सभापतीच्या निवडीसाठी अर्ज मागविण्यात आले. यात विविध समित्यांसाठी प्रत्येकी एक एक अर्ज आल्याने पिठासीन अधिकारी डॉ.जऱ्हाड यांनी उपनगराध्यक्ष हन्नान खान दुर्राणी यांची पाणीपुरवठा सभापती, श्रीमती फरजाणा बेगम कलीम अन्सारी यांची स्वच्छता व आरोग्य सभापती, अर्पिता अलोक चौधरी यांनी महिला व बालकल्याण सभापतीपदी तर गोविंद बब्रुवान हारकळ यांची बांधकाम सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. निवडीनंतर गटनेते जुनेद खान दुराणी यांनी नवनिर्वाचित सभापतींचा सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील उन्हाळे. माजी जिल्हा परिषद सदस्य चक्रधर उगले, अनिल पाटील, अतुल जत्ती, मुबारक चाऊस यांच्यासह नगरसेवक व राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. 

जिंतूरला बांधकाम सभापतीपदी शामराव मते 
जिंतूर ः नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांची निवड उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता.२०) पार पडली. शामराव मते यांची बांधकाम सभापतीपदी सलग तिसऱ्यावेळेस बिनविरोध निवड झाली. पाणीपुरवठा सभापतीपदी शाहेद बेग मिर्झा यांची तर महिला, बालकल्याण समितीपदी अर्चना काळे व स्थायी समिती सदस्यपदी आशा अंभोरे, फरजाना बेगम अहमद यांची निवड झाली. नगरपरिषदेत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांचे संख्याबळ जास्त असल्याने विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी समिती निवड प्रक्रियेत सहभाग घेतला. समित्यांची निवड एकतर्फी झाली. या वेळी सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षाचे गोपाळ रोकडे, सचिन गोरे, विलास भंडारे आदी नगरसेवक उपस्थित होते. निवडीबद्दल माजी आमदार विजय भांबळे, राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्षा प्रेक्षा भांबळे, नगराध्यक्षा सबिया बेगम फारोखी, उपाध्यक्ष बाळासाहेब भांबळे, मुख्याधिकारी आसाराम लोमटे, सभापती रामराम उबाळे, कफिलभाई फारोखी, मनोज थिटे, उस्मान पठाण, दलमीर पठाण, शोहेब जनिमिया, इस्माईल शेख, मनोहर डोईफोडे, चंद्रा बहिरट, बंटी निकाळजे, लखुजी जाधव आदींनी अभिनंदन केले. 

हेही वाचा - परभणी मंडळात 1 हजार 838 कोटी थकबाकी, वसुलीत कसुर करणाऱ्या अधिकाऱ्यावर होणार कारवाई

विशाल कदम, कुरेशी, सौ.कदम, सौ.खर्गखराटे, भोळे यांना संधी 
पूर्णा ः येथील नगरपरिषदेच्या स्थायी समित्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विशाल कदम, कुरेशी, सौ.कदम, सौ.खर्गखराटे, भोळे यांची सभापतीपदी निवड झाली. नगराध्यक्षा गंगाबाई एकलारे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पिठासान अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर व मुख्याधिकारी पंकज पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. त्यात पाणीपुरवठा सभापतीपदी हाजी कुरेशी, बांधकाम सभापतीपदी रेखाताई अनिल खर्गखराटे, स्वच्छता व आरोग्य सभापतीपदी मुकुंद भोळे, महिला व बालकल्यान सभापतीपदी विमलाबाई लक्ष्मणराव कदम, शिक्षण सभापती या पदसिद्धपदी उपनगराध्यक्ष विशाल कदम यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या सभापतीचा सत्कार नगराध्यक्षा गंगाबाई एकलारे यांनी करून शुभेच्छा दिल्या. सर्व प्रक्रिया बिनविरोध पार पाडल्याबद्दल विशाल कदम व संतोष एकलारे यांनी नगरसेवकांचे कौतुक करून आभार मानले.  

हेही वाचा - परभणी : ग्रामीण भागात आजपासून प्लास्टिक वेचणी मोहीम- शिवानंद टाकसाळे 

मानवतला विषय समितीच्या निवडी बिनविरोध 
मानवत ः येथील नगर परिषदेच्या बुधवारी (ता.२०) झालेल्या विशेष सभेत विविध विषय समितीच्या निवडी बिनविरोध करण्यात आल्या. विषय समितीच्या निवडीसाठी येथील नगर परिषद सभागृहात दुपारी एक वाजता विशेष सभेचे आयोजन केले होते. पिठासीन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी बी. एच. बिबे यांचा अध्यक्षतेखाली सभा पार पडली. नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्षा राणी अंकुश लाड यांची निवड करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी शितल गणेश कुऱ्हाडे, पाणीपुरवठा व जलनिस्सारण सभापतीपदी सुनिता गणेश कुमावत, स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य सभापतीपदी सरूबाई दशरथ भदर्गे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सारिका राजकुमार खरात यांची तर शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक कार्य समितीच्या सभापतीपदी गोपाळ श्रीकिशन गौड यांची नियुक्ती करण्यात आली. या वेळी नगरसेवक किरण बारहाते, मोहन लाड, दीपक बारहाते, दत्ता चौधरी, गणेश कुमावत, शाम चव्हाण, सर्जेराव देशमुख, बालाजी गोलाईत, आनंता भदर्गे, बालाजी कुऱ्हाडे, ऋषकेश बारहाते, श्रीकांत देशमुख, राजकुमार खरात उपस्थित होते. बैठकीसाठी मुख्याधिकारी जयंवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालय अधीक्षक एस. एल. बोरेवाड, ए. बी.जाधव, राजेश शर्मा, बळीराम दहे यांनी प्रयत्न केले. 

गंगाखेड नगरपालिकेत विषय समित्यांच्या निवडी 
गंगाखेड ः गंगाखेड नगर परिषदेची सर्वसाधारण बैठक (ता.२०) रोजी झाली. बैठकीमध्ये विषय समित्यांच्या निवड बिनविरोध करण्यात आल्या. नगरपरिषदेच्या सर्वसाधारण बैठकीत विषय समितीच्या निवडी बिनविरोध पार पडल्या. यामध्ये शिक्षण सभापतीपदी सत्यपाल साळवे, पाणीपुरवठा सभापतीपदी राजश्री दामा, बांधकाम सभापतीपदी सय्यद अकबर स्वच्छता व आरोग्य सभापतीपदी चंद्रकांत खंदारे महिला बाल विकास सभापतीपदी विमलबाई घोबाळे तसेच स्थायी समिती सदस्यपदी तुकाराम तांदळे, नागनाथ कासले व अजिज खान यांच्या बिनविरोध निवड करण्यात आल्या. याप्रसंगी २० नगरसेवक व नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया उपस्थित होते. निवडीप्रसंगी पिठासन अधिकारी म्हणून सुधीर पाटील तर सहायक म्हणून तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी काम पाहिले.  

सेलू नगर पालिकेच्या स्थायी समित्यांची निवड 
सेलूः येथील नगर पालिकेच्या स्थायी समित्यांची बुधवारी (ता.२०) बिनविरोध निवड करण्यात आली आहे. श्रीमती मंजुषा मुथा यांनी पिठासन तर संजय पल्लेवाड सहाय्यक पिठासन अधिकारी म्हणून काम पाहिले. नगर पालिकेच्या सभागृहात बुधवारी स्थायी व विषय समित्यांची समितीची बिनविरोध निवड झाली. यामध्ये स्वच्छता वैधक आणि सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी कमल रंगनाथअप्पा झमकडे, सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी शेख कासीम म.आयुब, पाणी पुरवठा व जलनि:सारण समिती सभापतीपदी उषा रमेशराव दौड, शिक्षण क्रिडा व सांस्कृतीक कार्य समिती सभापतीपदी शेख रहिम शेख गुलाम यांची तर सदस्यपदी उर्मिला विनोद बोराडे, सुनिता मारोती चव्हाण व हेमंतराव आडकळर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या प्रसंगी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.  

 

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election of subject committee chairpersons in Parbhani district, new faces in Pathri Parbhani News general news