esakal | रात्रभर २० गावांचा वीजपुरवठा खंडित, ग्रामस्थांमधून संताप
sakal

बोलून बातमी शोधा

MSEB

दिवसातून दहा ते पंधरा वेळा वीज गुल होत आहे. या प्रकारालाही ग्राहक वैतागले आहेत. लोहारा दरम्यान असलेल्या खांबामुळे वीज बिघाड होणे नित्याचेच आहे.

रात्रभर २० गावांचा वीजपुरवठा खंडित, ग्रामस्थांमधून संताप

sakal_logo
By
विलास कांबळे

हेर (जि.लातूर) : पहिल्याच (Latur) पावसाने महावितरणचे धिंडवडे उडाले आहेत. गुरुवारी (ता.दहा) झालेल्या पावसामुळे विद्युत बिघाड होऊन हेर (ता.उदगीर) (Udgir) परिसरातील तीन ३३ केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा (Electricity Supply) २० तास खंडित झाला होता. यामुळे जवळपास २० ते २५ गावांना महावितरणच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका बसला आहे. यात पुन्हा महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास उदगीर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या पहिल्याच अवकाळीने महावितरणची व्यवस्थाच कोलमडून पडली. यात लोहाच्या ३३ केव्ही वीजकेंद्रावरुन हेर परिसरातील ३३ केव्हींना वीजपुरवठा होणाऱ्या रिंगरोड बाजूच्या १५ खांबावरील डिस्क इन्सुलेटरमध्ये बिघाड झाला होता. परिणामी, लोहारासह हेर परिसरातील कुमठा खु, लोहारा व करडखेल येथील ३३ केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा खंडित झाला होता. सायंकाळी साडेचार वाजता खंडित झालेला वीजपुरवठा दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (ता.११) दुपारी साडेबारा वाजता पूर्ववत करण्यात आला. यामुळे परिसरातील हेर, लोहारा, भाकसखेडा, डिग्रस, कुमठा खु, करडखेल, वायगाव, नरसिंगवाडी यासह २० ते २५ गावांना रात्र अंधारात काढावी लागली. वीजपुरवठा खंडित असल्यामुळे पिण्याचे पाणी, मोबाईल, टीव्ही, फॅन आदी वीज उपकरणे बंद पडली होती. यातच गरमीचा त्रास असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. (Electricity Outage In 20 Villages Over Night In Latur District)

हेही वाचा: लातूर जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रुग्ण कमी, पण मृत्यू वाढतेच

महिनाभरापासून विजेचा लपंडाव

मागील महिनाभरापासून हेर परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे. दिवसातून दहा ते पंधरा वेळा वीज गुल होत आहे. या प्रकारालाही ग्राहक वैतागले आहेत. लोहारा दरम्यान असलेल्या खांबामुळे वीज बिघाड होणे नित्याचेच आहे. गत वर्षीही तीन ३३ केव्हीचा वीजपुरवठा दोन दिवस खंडित झाला होता. ही घटना सततचीच आहे.