कापडी पिशव्या निर्मितीतून पाचशे महिलांना रोजगार 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 January 2019

परळी वैजनाथ - प्लॅस्टिकबंदी झाल्यानंतर परळी शहरात ज्यूटच्या कापडी पिशव्या बनविण्याचा लघुउद्योग मोठ्या प्रमाणात वाढला असून, सुमारे पाचशे महिलांना या उद्योगाने रोजगार उपलब्ध करून दिला आहे. परळी येथे तयार होणाऱ्या पिशव्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांसह शेजारच्या राज्यांत विक्रीला जात आहेत. हजारो रुपयांची उलाढाल यातून येथे होत आहे. 

परळी वैजनाथ - प्लॅस्टिकबंदी झाल्यानंतर परळी शहरात ज्यूटच्या कापडी पिशव्या बनविण्याचा लघुउद्योग मोठ्या प्रमाणात वाढला असून, सुमारे पाचशे महिलांना या उद्योगाने रोजगार उपलब्ध करून दिला आहे. परळी येथे तयार होणाऱ्या पिशव्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांसह शेजारच्या राज्यांत विक्रीला जात आहेत. हजारो रुपयांची उलाढाल यातून येथे होत आहे. 

प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे कापडी पिशव्यांना मागणी वाढली आहे. परळी हे शहर श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग क्षेत्र म्हणून देशभर ख्याती पावलेले आहे. आता लाल मातीच्या विटा, राख्या तयार करणारे गाव म्हणून ओळखले जात आहे. तर आता बाजारी कापडी पिशव्या बनविण्याचे गाव म्हणून सर्वत्र ओळखले जाऊ लागले आहे. 2003 पासून परळी शहरात या कपडापासून बाजारी पिशव्या बनविण्याचा व्यवसाय सुरू आहे. शहरात दररोज सरासरी तीस ते पस्तीस हजार बाजारी कापडी पिशव्या तयार होतात. दहा ते बारा जण हा व्यवसाय येथे करीत आहेत. प्रत्येक व्यावसायिकाकडे तीस ते चाळीस महिला या पिशव्या शिवण्याचे काम करीत असून, सुमारे पाचशे महिलांना यामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे. घरचे काम सांभाळून रिकाम्या वेळात महिला घरच्या घरी या पिशव्या शिवण्याचे काम करतात. 

पिशव्यांसाठी लागणारे कापड कट करून व्यावसायिकच देतात. त्यासाठी लागणारा नायलॉनचा बंदही दिला जातो. या कापडाचा दर 150 ते 170 रुपये किलो असा आहे. टनावर हा कपडा परळीत येतो. बाजारी कापडी पिशवीचे किरकोळ विक्रीचे दर दहा रुपये व मोठ्या आकाराच्या पिशवीचे पंधरा ते वीस रुपये असे आहेत. ही पिशवी बनविण्यासाठी शिवणावळ खर्च नऊ ते दहा रुपये डझन असा आहे. एक महिला दिवसाकाठी 20 ते 35 डझन पिशव्या शिवते. या शिवणकामातून त्यांना तीनशे ते साडेतीनशे रुपये रोज मिळतो. 

बनविण्यासाठी लागणारा खर्च 
कापड अडीच रुपये, नायलॉनचा बंद एक रुपया, शिवणावळ एक रुपया असे मिळून एका पिशवीला साडेचार ते पाच रुपये खर्च येतो. छोटी कापडी पिशवी व्यापाऱ्यांना पन्नास ते साठ रुपये डझन या ठोक भावाने विकली जाते, तर मोठ्या आकाराची पिशवी व्यापाऱ्यांना एकशे तीस ते एकशे चाळीस रुपये डझन या ठोक भावाने विकली जाते. छोटी पिशवी बाजारात दहा रुपये व मोठी पिशवी पंधरा ते वीस रुपये या दराने विकली जाते. 

येथे जातात पिशव्या 
पुणे, मुंबई यांसह हैदराबाद, लातूर, निलंगा, चाकूर, पंढरपूर, उस्मानाबाद, बार्शी, कुर्डुवाडी, फलटण, बारामती, सासवड, नगर, शिर्डी, औरंगाबाद, जालना, परभणी, सोनपेठ, गंगाखेड, उदगीर, माजलगाव, कळंब, कर्जत, जामखेड, आळंद आदी ठिकाणच्या बाजारपेठांत विक्रीला पिशव्या जातात. सुरवातीला विष्णुदास बंग, शंकर गर्जे यांनी हा व्यवसाय येथे सुरू केला. आता सतीश भूमकर, ज्ञानेश्वर कराळे, ज्ञानेश्वर खाकरे, रविशंकर बुद्धे, आदी व्यावसायिक हा उद्योग येथे करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Employment of 500 women from the making of cloth bags