पर्यावरणाच्या ऱ्हासातून कोरोनाचे संकट, पर्यावरणतज्ज्ञ देऊळगावकर यांचे मत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 मे 2020

मानवाने स्वतःच्या लाभासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत गेला. त्यातूनच हे कोरोनाचे संकट आले आहे, असे मत पर्यावरणाचे अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केले.

लातूर : मानवाने स्वतःच्या लाभासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत गेला. त्यातूनच हे कोरोनाचे संकट आले आहे, असे मत पर्यावरणाचे अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केले. मानव स्वतःच्या स्वार्थासाठी जंगले नष्ट करत आहेत. त्यामुळे जंगलातील प्राणी, पशू, पक्षी शहरांकडे येत आहेत. त्यातून साथीचा रोग पसरत आहेत. जंगलाचा विनाश जसजसा वाढत जाईल, तसतसे साथीचे रोग वाढत जातील, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र ऑर्थोपेडीक असोसिएशनचा स्थापना दिनानिमित्ताने लातूर ऑर्थोपेडीक असोसिएशन व पोद्दार हॉस्पिटलच्या वतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. ‘कोरोनाआधी आणि कोरोनानंतर’ या विषयावर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हे व्याख्यान झाले. देऊळगावकर म्हणाले, कोरोनामुळे लोक आता पर्यावरणाविषयी बोलत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. देशातील टाळेबंदीमुळे हवा, पाणी शुद्ध झाले. दिल्‍लीच्या यमुना नदीच्या पाण्यात ऑक्सिजन नव्हता. आता हे पाणी पूर्णपणे शुद्ध झाले आहे. कारखाने बंद असल्याने नद्यांमध्ये जाणारे दुषित पाणी थांबले आहे. त्यामुळे नद्यांचे पाणी शुद्ध होऊन त्या आता मोकळा श्‍वास घेत प्रवाहित झाल्या आहेत. महाराष्ट्रात ४९ नद्यांची स्थिती अतिशय भयावह होती. त्या नद्या गेल्या ४० दिवसांतील टाळेबंदीमुळे शुद्ध झाल्या आहेत.

कुटुंबाने `अलगीकरण` केलेल्या वृद्धांची ग्रंथांशी मैत्री, लातूरच्या...

सक्रिय लोकशाहीत आपले मत मतपेटीपुरते मर्यादित ठेवाल तर अधिकारी-लोकप्रतिनिधींना जाब कोण विचारणार, असा सवाल उपस्थित करून देऊळगावकर म्हणाले, पुढील पिढीला काही चांगले द्यावयाचे असेल तर आपला महाराष्ट्र प्रदूषणमुक्त झाला पाहिजे. लातूरची लोकसंख्या पाच लाख आहे. पण, या शहरात दहा वर्षे वयाची दहा हजार झाडेही नाहीत. लातूर शहरात दररोज १०० ते १५० कॅन्सरचे रूग्ण उपचार घेतात. हे पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे घडत आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Environmental Degradation Create Corona Crisis, Said Deulgaonkar