भाविकांच्‍या वाहनाला आचमपेठ(आंध्रप्रदेश) जवळ अपघात ; तीन ठार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 जुलै 2017

औंढा नागनाथ तालुक्‍यातून खाजगी वाहनाने तिरुपतीकडे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची क्रुझर जीप आचमपेठजवळ (आंध्रप्रदेश) पुलाच्‍या कठड्याला धडकून झालेल्‍या अपघातात तीन जण ठार तर नऊ जण जखमी झाल्याची घटना रविवारी (ता.23) पहाटे चार वाजता घडली.
 

हिंगोली- औंढा नागनाथ तालुक्‍यातून खाजगी वाहनाने तिरुपतीकडे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची क्रुझर जीप आचमपेठजवळ (आंध्रप्रदेश) पुलाच्‍या कठड्याला धडकून झालेल्‍या अपघातात तीन जण ठार तर नऊ जण जखमी झाल्याची घटना रविवारी (ता.23) पहाटे चार वाजता घडली.

या बाबत माहिती अशी की, औंढा नागनाथ (जि. हिंगोली) तालुक्‍यातील रुपूर, रुपूरतांडा व सिध्देश्वर कॅम्‍प येथील बारा भावीक जीपने (एमएच 38- 4556) तिरुपतीच्या दर्शनासाठी शनिवारी (ता.22) दुपारी रवाना झाले होते. आज पहाटे चारच्‍या सुमारास त्‍यांची जीप हैद्राबादपासून वीस किलोमिटर अंतरावर आचमपेठ गावाजवळ आली. यावेळी चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्‍याने जीप एका पुलाच्‍या कठड्यावर आदळली. यावेळी अचानक मोठा आवाज झाल्‍यानंतर वाहनातील भाविक जागे झाले. या अपघातामध्ये रुपुरतांडा येथील संतोष राठोड (वय 22), रुपूर येथील राजेश सांगळे (वय 22) यांचा जागीच मृत्‍यू झाला. तर साळणा येथील वाहन चालक नवनाथ दराडे यांच्‍यासह इतर नऊ जण जखमी झाले. अपघातामध्ये जीपच्‍या डाव्या बाजूचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातस्‍थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

अपघाताची माहिती मिळताच आचमपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामाकृष्णा, जमादार श्री. नईम यांच्‍या पथकाने घटनास्‍थळी धाव घेतली. पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक सुरळीत करून जखमींना हैद्राबाद येथील उस्‍मानिया हॉस्‍पीटलमध्ये पाठवले. मात्र चालक नवनाथ दराडे याचा उपचार सुरु असताना मृत्‍यू झाल्‍याचे जमादार श्री. नईम यांनी दूरध्वनीवरून बोलताना सांगितले. या अपघातामधील जखमींमध्ये रामदास सांगळे, परसराम सांगळे, संतोष बांगर (रा. सिद्धेश्वर कॅम्‍प), गजानन सांगळे, गजानन नागरे, बालाजी नागरे, बंडू मुंढे (रा. रुपूर), वैजनाथ आडे (रा. रुपूर तांडा), नंदू घोडके (रा. औंढा नागनाथ) यांचा समावेश आहे. त्‍यांच्‍यावर हैद्राबाद येथील उस्‍मानिया हॉस्‍पीटलमध्ये उपचार सुरु असल्‍याचे जमादार श्री. नईम यांनी सांगितले. या प्रकरणी आचमपेठ पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाल्‍याचे श्री. नईम यांनी स्‍पष्ट केले.
दरम्‍यान, अपघाताची माहिती मिळाल्‍यानंतर रुपूर, सिद्धेश्वर कॅम्‍प व रुपूर तांडा येथील गावकऱ्यांनी घटनास्‍थळाकडे धाव घेतली. सायंकाळी उशिरापर्यंत मृतदेह गावाकडे आणण्यात आले नव्‍हते.                   

Web Title: esakal news sakal news hydrabad news accident news