इथे मरणाचेही भय वाटे...

नवनाथ येवले
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

नांदेड जिल्ह्यातील पार्डी (ता.अर्धापुर) येथील ग्रामपंचायतीकडे स्मशानभुमीची नोंदच नाही; पिढीणपार स्मशानभुमीवर मालकीचा दावा, अंत्यसंस्काराची समस्या 
 

नांदेड : मृत्यू हा एखाद्यावर अचानक झडप घालू शकतो किंवा एखाद्याला तो रोज तीळ-तीळ मारू शकतो. मृत्यूमुळे होणाऱ्या वेदना आपण टाळू शकत नाही. पण, मृत्यूनंतरही दफनविधीसाठी जागा मागण्याची वेळ पार्डी (ता. अर्धापूर) येथील माणसांवर यावी हे दूर्दैव म्हणावे की शोकांतीका असा प्रश्न आहे. पिढीनपार दफणविधीसाठी वापरात असलेल्या जागेची ग्रामपंचायतीमध्ये स्मशानभुमी म्हणून नोंद नाही. त्यामुळे मृत्यूनंतर अंत्यविधीची समस्या निर्माण होत असल्याने मरणाचेही भय वाटावे अशी अवस्था निर्माण झाली आहे. 

मृत्यूनंतर अंत्यविधी करण्यापूर्वी मृतदेहावर अखेरचे कौटुंबिक, सामाजिक आणि धार्मिक संस्कार करण्यात येतात. दिवंगत व्यक्तीच्या शरीराचे दहन व्यवस्थितपणे व्हावे, या उद्देशाने गावकुसाबाहेर दफविधीसाठी स्मशानभुमीची जागा राखीव असते. विविध जाती - धर्माच्या संस्कृतीनुसार गावच्या पांढरीत पिढीनपार स्मशानभुमीच्या जागा अस्तित्वात आहेत. अशाच पिढीणपार दफणविधीसाठी वापरात असलेल्या पार्डी येथील नदीच्या उजव्या तिरावर मातंग समाजाची स्मशानभुमी आहे. गावकुसाबाहेर चोरंबा पांदणरस्त्याच्या शेजारी गट नंबर ६७  ह्या मालकीचे क्षेत्रास लागून गायराण जमिनीत पिढीणपार दफणविधी केले जातात. 

ग्रामपंचायतीकडे नोंदणीची मागणी   
गावकुसातील गट नंबर ६७ मधील जमीन मालकीचे क्षेत्र असून त्या शेजारी गायराण जमिनीतील स्मशानभुमी क्षेत्राची नोंद अद्याप ग्रामपंचायत कार्यालयामध्ये नाही. दफणविधीसाठी वापरातील जमीन नवनाथ देशमुख यांच्या मालकीच्या गट नंबर ६७ मध्येच असल्याचा दावा करण्यात येत आहे. प्रत्यक्षात मातंग समाजाच्या दफणविधीसाठी वापरातील जमिनीची ग्रामपंचायत कार्यालयामध्ये स्मशानभुमी म्हणून नोंद नसल्याने अंत्यविधीसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. मृत्यूनंतर दिवंगत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी समस्यांना तोंड द्यावी लागत असल्याने नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयाकडे पिढीणपार दफणविधीसाठी वापरातील जमिनीची स्मशानभुमी म्हणून नोंदनीची मागणी केली. 

हे ही वाचवा - शंकरनगरच्या ‘त्या’ प्रकरणातील फरारी आरोपीला अटक

ग्रामपंचायतीच्या जाहीर ग्रामसभेत ठराव
मातंग समाज स्मशानभुमीची नोंद नसल्याने अंत्यविधीची समस्या निर्माण होत असल्याने जानेवारी २०२० (ता.२६) च्या जाहीर ग्रामसभेत नोंदणीचा ठरवा घेण्यात आला. ग्रामसभा सुरू असताना येथील नागरिकांनी स्मशानभुमीचा मुद्दा उपस्थित करत ग्रामस्थ नागरिकांचे लक्ष वेधले होते. त्यानुसार मातंग समाज पिढीणपार दफणविधीसाठी वापरत असलेल्या गट नंबर ६७ शेजारील जमिनीची स्मशानभुमी म्हणून नोंद करण्याचा ठराव जाहीर ग्रामसभेत घेण्यात आला. 

स्मशानभुमीसाठी आंदोलनाचा इशारा 
पिढीणपार दफणविधीसाठी वापरातील गट नंबर ६७ मधील अथवा शेजारील जमिनीची स्मशानभुमी म्हणून नोंद करण्यात यावी, आगामी काळात या जमिनीचा अंत्यसंस्कारासाठी वापर करता यावा, यासाठी स्मशानभुमी म्हणून येथील क्षेत्र संरक्षित करण्यात यावे आदी मागण्यांसाठी सी. एम. पार्डीकर यांच्यासह ग्रामस्थ नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Even dying here ...