esakal | Latur : मांजरा धरणातून जास्तीचे पाणी सोडले?
sakal

बोलून बातमी शोधा

Latur : मांजरा धरणातून जास्तीचे पाणी सोडले?

Latur : मांजरा धरणातून जास्तीचे पाणी सोडले?

sakal_logo
By
विकास गाढवे - सकाळ वृत्तसेवा

लातूर : सिंचन व पिण्याच्या पाण्याकरिता धनेगाव (ता. केज) येथील मांजरा धरण अतिशय उपयुक्त आहे. यामुळे धरणातील पाण्यावर सर्वांचे लक्ष असते. गुलाब चक्रीवादळामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. यामुळे धरणात पाण्याचा येवा अचानक वाढला. येणाऱ्या पाण्याच्या तुलनेत कमी पाणी सोडण्याचे नियोजन केले जाते. मात्र, जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचा अंदाज हुकला आणि धरणातून जास्तीचे पाणी नदीत सोडण्याचा संशय आहे. या संशयाला पुस्ती देणाऱ्या काही घटना घडल्या. यामुळेच पालकमंत्री अमित देशमुख यांनी पाणी सोडण्यासाठी केलेल्या कार्यवाहीचा इत्थंभूत अहवाल जलसंपदा विभागाकडून मागवला आहे.

२७ सप्टेंबर रोजी रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे नदी व नाले भरून वाहिले आणि मांजरा नदीला पूर आला. आधीच काठोकाठ भरलेल्या व विसर्ग सुरू असलेल्या मांजरा धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येण्यास सुरवात झाली. यामुळे २८ सप्टेंबर रोजीच्या पहाटे धरणाचे सर्व १८ दरवाजे उघडण्याचे निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पावसाने उघडीप दिली तर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच राहिला. २९ सप्टेंबर रोजी दुसऱ्या दिवशीही हा विसर्ग सुरू होता. यामुळे पाऊस नसतानाही मांजरा नदीला पूर आला आणि भातखेडा (ता. लातूर) येथील मांजरा नदीवरील पुलावर पाणी आले. यामुळे लातूर ते नांदेड रस्त्यावरील वाहतूक १९ तास बंद राहिली. पाण्यामुळे नदीकाठच्या शेतीचे तसेच घरांचे मोठे नुकसान झाले. पाण्याचा येवा कमी होताच धरणाचे दरवाजे हळूहळू बंद करणे अपेक्षित होते. मात्र, अधिकाऱ्यांचा अंदाज चुकला धरणातून येवाच्या तुलनेत जास्त पाणी वाहून गेले. धरण क्षमतेच्या ८६ टक्के पाणीसाठा ठेऊन उर्वरित १४ टक्के पाणी निघून गेल्याचे लक्षात आल्यानंतर दरवाजे बंद करण्यास सुरवात झाल्याची चर्चा घडून आली. त्यानंतर २९ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले. पाण्याचा येवा सुरू असताना सर्व दरवाजे बंद झाल्यानंतर सर्वांच्याच मनात शंकेचे पाल चुकचुकली. त्यानंतर सर्वांच्या नजरा धरणातील पाणीसाठ्याकडे वळल्या. त्यातूनच मांजरा पट्ट्यात चर्चेला उधाण आले. अन् पालकमंत्री देशमुख यांच्या कानावर ही गोष्ट गेली.

नशीब येवा सुरू होता...!

जलसंपदा विभागाकडून पाण्याचा येवा लक्षात घेऊन तुलनेने कमी पाण्याचा विसर्ग करण्यात येतो. मात्र, येवापेक्षा जास्त पाणी सोडण्याचे कारण कोणालाच कळाले नाही. तातडीने हालचाली करून सर्व दरवाजे बंद केल्यानंतर धरणात पाणी येण्याबाबत शंकाकुशंका व्यक्त होऊ लागल्या. नशिबाने येवा मोठ्या प्रमाणात सुरू होता. पावसानंतर तो पंधरा दिवस सुरूच असतो. त्याचा फायदा झाला आणि २९ सप्टेंबर रोजी दहा वाजता दरवाजे बंद केल्यानंतर तब्बल तीन दिवसांनी दोन ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजता धरण पूर्ण क्षमतेने भरले आणि त्यानंतर पुन्हा दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. गेल्यावर्षी मांजरा नदीवरील एका बॅरेजेसबाबत असाच प्रकार झाला होता. चौकशीअंती अधिकाऱ्यांवर कारवाई झाली. तेव्हाही नशिबाने पाणी साठले गेले.

वेळेत संचलन तरीही अहवाल द्या

पालकमंत्री देशमुख यांनी शुक्रवारी (ता. एक) जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत या विषयावर जलसंपदा विभागाला अहवाल देण्यास सांगितले आहे. पत्रकार परिषदेतही त्यांनी ही माहिती दिली. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर विसर्ग कमी करता आला असता का? येवा तुलनेत विसर्ग जास्त होता का? पाण्याचा कमी-जास्त दाब लक्षात घेता धोका टाळता आला असता का? आवश्यक तेवढ्या पाण्याचा विसर्ग झाला का? आदी मुद्यांवर जलसंपदा विभागाला अहवाल देण्यास सांगितले आहे. अहवालावरून येत्या काळात काही उपाययोजना करणे शक्य होईल. जलसंपदा विभागाने मांजरा धरणातील पाण्याबाबत वेळेत संचलन केल्याची माहिती मला दिली आहे. तरीही अहवाल देण्यास सांगण्यात आल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.

loading image
go to top