खळबळजनक, पाच हजार कोंबड्या मारण्याचे आदेश 

गणेश पांडे 
Monday, 11 January 2021

परभणी तालुक्यातील गावातील पोल्ट्री फॉर्मवर काम करणारे व त्यांच्या संपर्कात आलेल्या ३० जणांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. तसेच मुरंबा गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले असून गावातील रस्ते असे बंद करण्यात आले आहेत. 

परभणी : मुरुंबा (ता.परभणी) येथे आठशे कोंबड्यांचा अचानक मृत्यु झाल्याची घटना शुक्रवारी घडली होती. या मृत पावलेल्या कोंबड्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळेच झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली. दरम्यान, मुरंबा गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले असून गावातील चार ते पाच हजार कोंबड्या मारण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे.
 
मुरुंबा गावातील ८०० कोंबड्यांचा अज्ञात रोगाने मृत्यु झाला. जिल्हा प्रशासन, पशुसंवर्धन विभागाने तत्काळ गावात धाव घेऊन उपाययोजना करित पक्षांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले. तिथून हे स्वब भोपाळ येथे पाठवण्यात आले, ज्यांचा अहवाल रविवारी (ता.दहा) रात्री उशिरा जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला. त्यात 'बर्ड फ्लू' मुळेच कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे नमूद केले. यामध्ये गावात उपाययोजना करण्यात येत आहेत. 

गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणुन घोषित 
मुरुंबा गावातील कोंबड्यांचा मृत्यू हा ‘बर्ड फ्लु’ने झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर हे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणुन घोषित करण्यात आले. गावाच्या एक किलोमीटर परिसरातील कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले. शिवाय गावातील दहा किलोमीटर परिसरात कुकूट पक्ष्यांची खरेदी, विक्री, वाहतुक, बाजार व जत्रा, प्रदर्शन तसेच पशुपक्ष्यांच्या अवागमनास बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले. मुरूंबा (ता.परभणी) गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गावात पशूसंवर्धन विभागाकडून सर्वेक्षणाचे काम सुरु करण्यात आले. 

हेही वाचा - पोलिस ठाण्याजवळ ज्येष्ठ नागरिकावर चाकू हल्ला, चाकूरमधील घटना

गावातील ३० ग्रामस्थांचे नमुने घेतले 
गावातील पोल्ट्री फॉर्ममधील कोंबड्या मध्ये ‘बर्ड फ्लू’ आढळून आल्यानंतर गावात सतर्कतेचे आदेश दिले आहेत. पोल्ट्री फॉर्मवर काम करणारे व त्यांच्या संपर्कात आलेल्या ३० जणांचे स्वॅब H५N१ तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. 

हेही वाचा - बिलोली तहसीलमध्ये गाव तर मतदान धर्माबाद तालुक्यात; २५ वर्षापासून काराळचे भिजत घोंगडे

‘बर्ड फ्लू’चा परिणाम बाजारावर 
मुरंबा गावातील कोंबड्या मध्ये H५N१ या विषाणूची लागन झाल्याचे निष्पन्न झाले. याचा परिणाम चिकन मार्केटवर आढळून आला. परभणीच्या बाजारात चिकन १८० रुपये प्रती किलोने विक्री केले जात होते. तेच चिकन आज १४० रुपये किलोने विकावे लागत आहे. शिवाय ३० अंड्यांची किमत जी काल १७५ रुपयाने विक्री केली जात होती. आज १४५ रुपये म्हणजे ३० रुपये कमीने विकावी लागत आहे. त्यातही रोजच्या मानाने ५० टक्केपेक्षा कमी ग्रहक असल्याने हे चिकन विक्रेते अडचणीत सापडले आहेत. 

मराठवाड्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा- 

एक किलोमीटर क्षेत्रातील पाळीव पक्षी करणार नष्ट : जिल्हाधिकारी 
मुरुंबा गाव परिसरातील एक किलोमीटरमधील पाळीव पक्षी नष्ट केले जाणार आहेत. शिवाय दहा किलोमीटरच्या परिसरात सर्व प्रकारच्या पक्षांची ने-आन, खरेदी विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. गावातील प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. 
- दीपक मुगळीकर, जिल्हाधिकारी, परभणी. 

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Exciting, order to kill five thousand hens Parbhani general news