पिके करपू लागल्यानंतर कृत्रिम पावसाचा प्रयोग

राजेभाऊ मोगल
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

मराठवाड्यात यंदाही अपेक्षित पाऊस झालेला नाही. दरम्यान, कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी 30 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली. मात्र, अर्धा पावसाळा उलटून गेला, पिके करपू लागल्यानंतर कृत्रिमच्या प्रयोगाला सुरवात करण्यात आली. एवढा विलंब का झाला ? प्रशासकीय यंत्रणेला याचे काहीही सोयरसुतक नसल्याचेच स्पष्ट होते आहे.

औरंगाबाद - मराठवाड्यात यंदाही अपेक्षित पाऊस झालेला नाही. दरम्यान, कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी 30 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली. मात्र, अर्धा पावसाळा उलटून गेला, पिके करपू लागल्यानंतर कृत्रिमच्या प्रयोगाला सुरवात करण्यात आली. एवढा विलंब का झाला ? प्रशासकीय यंत्रणेला याचे काहीही सोयरसुतक नसल्याचेच स्पष्ट होते आहे. एवढ्या उशिरा पाडण्यात येणारा पाऊस खरिपासाठी खरंच तारक ठरेल का, असे प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. 

28 मे 2019 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पर्जन्यवाढीसाठी उपाययोजना म्हणजे कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. मात्र, अर्धा पावसाळा उलटून गेल्यानंतर हे प्रयोग सुरू झाले. नऊ ऑगस्ट रोजी पहिला प्रयोग करून पाहिल्यानंतर मागील चार आठवड्यांपासून यंत्रणा कामाला लागली. मात्र, ज्यावेळी ढग होते, पाऊस पाडण्यासाठी पोषक वातावरण होते त्यावेळेस फारशी हालचाल करण्यात आली नाही. आता ढग गायब झाल्यावर पावसाचा प्रयोग केला जात आहे. 

प्रारंभी सोलापूर येथून मागविलेले विमानही नंतर निघून गेले. त्यानंतर अमेरिकेतून मागविलेले विमान सौदीतून येण्यास उशीर झाला. त्यानंतर दोन दिवसांपासून अमेरिकन विमानाच्या माध्यमातून सुरू झालेल्या प्रयोगाला यश येत असल्याचा दावा महसूल विभागाने केला आहे. असे असले तरी विलंब का झाला, याचे उत्तर मात्र दिले जात नाही. कृत्रिम पावसाच्या प्रयोगावर तब्बल 30 कोटी रुपये खर्च केला जातोय. मात्र, त्या तुलनेत हा प्रयोग यशस्वी होतोय का ? त्याचा फायदा होतो का ? असे प्रश्‍न विचारले असता थोडा वेळ द्यावा लागेल, असे उत्तरे याकामी नेमण्यात आलेले अधिकारी देत आहेत. यावरूनच अधिकाऱ्यांच्या वेळकाढू धोरणामुळेच या प्रयोगाला उशीर झाल्याची चर्चा होत आहे. 

 

कृत्रिम पाऊस पडला, हा दावा प्रशासन कशाच्या आधारे करीत आहे? प्रयोग करणारे शास्त्रज्ञ, सल्लागार यांनी प्रयोग करताना वेळेनुसार रडार, ढगातील लिक्विड वॉटर कंटेन्ट यांची माहिती खुली करावी. प्रयोगात कोणती रसायने, किती फवारणी ढगातील कोणत्या भागात केली आणि त्याचा परिणाम कसा कसा होत गेला, हेदेखील जाहीर सांगायला हवे. याबाबत काहीही सांगितले जात नाही, त्यामुळे संशयाला वाव आहे. 
-किरणकुमार जोहरे, हवामानतज्ज्ञ. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Experiment with artificial rainfall after the crop is harvested