esakal | सोलापूरच्या खासदारांचे बनावट जात प्रमाणपत्र प्रकरण; तलमोडच्या चौघांची चौकशी

बोलून बातमी शोधा

solapur}

बनावट जातप्रमाणपत्राचे उमरगा कनेक्शन असल्याचे समोर येत असल्याने पोलिस त्याची चौकशी करताहेत

सोलापूरच्या खासदारांचे बनावट जात प्रमाणपत्र प्रकरण; तलमोडच्या चौघांची चौकशी
sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (उस्मानाबाद):  सोलापूरचे भाजपाचे खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी यांच्या बनावट जातप्रमाणपत्राच्या अनुषंगाने गुन्हे शाखेने उमरगा तालुक्यातील डिग्गी व तलमोड येथील काही संशयितांची चौकशी केली. त्यापैकी शुक्रवारी (ता.पाच) चौघांना सोलापूर येथे बोलावून पोलिसांनी जबाब नोंदविला आहे.

खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी यांनी लोकसभा निवडणुकीत बनावट जात प्रमाणपत्र दिल्याची तक्रार प्रमोद गायकवाड यांनी जात पडताळणी समितीकडे केली होती. त्यानंतर जात पडताळणी समितीने त्याची पडताळणी करुन तो दाखला अपात्र ठरविला. त्यानंतर त्यांनी अक्‍कलकोट तहसिलदारांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार अक्‍कलकोट तहसिलदारांनी बनावट जात प्रमाणपत्राचा गुन्हा दाखल केला. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी आता त्याची सखोल चौकशी सुरु केली आहे.

सेनगावच्या पाच जणांवर खुनाचा गुन्हा, सेनगाव- लिंगदरी रोडवरील अपघात प्रकरण

सर्वप्रथम अक्‍कलकोटमधील शिवसिध्द बुळ्ळा याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली. आता बुळ्ळा हा न्यायालयीन कोठडीत आहे. बुळ्ळा याने दिलेल्या माहितीनुसार आणि पोलिस तपासांत समोर आलेल्या बाबींनुसार गुन्हे शाखेने खासदारांचा जबाब घेतला. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांच्या पथकाने गुरुवारी (ता. चार) उमरगा तहसिल व उमरग्यातील डिग्गी आणि तलमोड येथील काही जणांची चौकशी केली. दरम्यान तलमोडच्या चौघांना शुक्रवारी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. चौकशी नेमके कोणती विचारणा झाली याची अधिकृत माहिती समजू शकली नाही मात्र शपथपत्र कोणत्या आधारे दिले याची तपासणी पोलिस करताहेत.

नागरिकांनी काळजी घेतल्यास कोरोना रुग्णांची संख्या कमी होईल; विभागीय आयुक्त...

खासदारांना चौकशीसाठी पुन्हा बोलावणार ! 
बनावट जातप्रमाणपत्राचे उमरगा कनेक्शन असल्याचे समोर येत असल्याने पोलिस त्याची चौकशी करताहेत. या प्रकरणी खासदार डॉ. महास्वामीजी यांना पुढील आठवड्यात त्यांचा पुन्हा एकदा जबाब घेतला जाणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून सांगितली जात आहे.