दीडशेच्या चड्डीसाठी दिले नकली दोन हजार 

दिलीप पवार
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

शहागडला व्यापाऱ्यांच्या सजगतेमुळे एकजण पकडला 

अंकुशनगर (जि. जालना)- अंबड तालुक्‍यातील शहागड येथे कापड दुकानात दीडशे रुपयांची अंडरवेअर- चड्डी विकत घेतल्यानंतर दोन हजार रुपयांची नकली नोट देणारा संशयित व्यापाऱ्याच्या सजगतेमुळे शनिवारी (ता.नऊ) सायंकाळी पकडला गेला. दरम्यान, संशयिताजवळ झडतीत दोन हजार रुपयांच्या नऊ बनावट नोटा आढळल्या. याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

औरंगाबाद-बीड राष्ट्रीय महामार्गावरील शहागड येथील बसस्थानकासमोर लक्ष्मणराव धोत्रे यांचे रणवीर कलेक्‍शन हे कापड दुकान आहे. दुकानात शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान एक ग्राहक दुकानात आला. त्याने दीडशे रुपयांची अंडरवेअर खरेदी केली. त्यानंतर दोन हजार रुपयांची नोट काढून व्यापारी लक्ष्मणराव यांना दिले. या दोन हजार रुपयांच्या नोटमध्ये काहीतरी गडबड असल्याची शंका लक्ष्मणराव यांना आली. त्यांनी निरखून पाहिली असता ही नोट नकली असल्याचे लक्षात आले.

ग्राहक अंडरवेअर घेऊन काढता पाय घेत असतानाच लक्ष्मणराव यांनी प्रसंगावधान राखत नकली नोट देणाऱ्या ग्राहकास पकडले. त्यास तत्काळ शहागड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिस चौकशीत या ग्राहकाचे नाव परमेश्‍वर मारोती कानगुडे (वय 42, रा. गेवराई, जि. बीड) असे असल्याचे समोर आले. त्याची झडती घेतली असता दोन हजार रुपयांच्या नऊ बनावट नोटा आढळल्या. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस चौकीत गुन्हा नोंद घेणे सुरू असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वारे यांनी दिली. 

रॅकेट असण्याची शक्‍यता 
व्यापारी लक्ष्मण धोत्रे यांच्या दक्षतेमुळे बनावट नोटा बाजारात आणण्याचा डाव उघडकीस आला. अन्यथा, अनेक लोकांना नकली नोट देऊन गंडा घातला गेला असता. दरम्यान, संशयित परमेश्‍वर कानगुडे याच्याजवळ पोलिसांना दोन हजार रुपयांच्या नऊ बनावट नोटा आढळल्या. या नोटा कुठे प्रिंट केल्या, यामागे रॅकेट आहे काय, याची माहिती पोलिस घेत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fake currency