पपईवर रोटाव्हेटर फिरवून तोडली बाग, टाळेबंदीचा शेतकऱ्यांना फटका

Papaya Farmers, Chakur News
Papaya Farmers, Chakur News

नळेगाव (जि.लातूर) ः टाळेबंदीमुळे गेल्या एक महिन्यापासून सर्व व्यवहार, व्यवसाय व वाहतूक बंद असल्याने शेतीमालाच्या उठावावर मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान, जीवनावश्यक वस्तूंमध्ये भाजीपाल्याची विक्री काही प्रमाणात होत आहे. मात्र फळपिकांवर कमालीची मर्यादा आली आहे. नळेगाव (ता. चाकूर) परिसरात पपईच्या बागा जागेवरच खराब होत असल्याने शेतकऱ्यांना गेल्या काही दिवसांत लाखो रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे. पपईची शेती करणारे शेतकरी चांगले धास्तावले आहेत. रोटाव्हेटर फिरवून बाग तोडून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.


नळेगाव परिसरातील अनेक शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती न करता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करीत आहेत. सध्या कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन आहे. त्याची मोठी झळ भाजीपाला, शेती, फळबागांना बसली आहे. संचारबंदीमुळे दैनंदिन व्यवहार ठप्प असून वाहतूक बंद केल्याने पपईची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. निघालेल्या मालाचे काय करायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. नळेगाव परिसरात भाजीपाला, टरबूज, काकडी, पपई लागवड केली आहे.

कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्याने पपईला मागणीच राहिली नाही. पपई नाशवंत असून जास्त काळ टिकत नाही. यामुळे लिंबाळवाडी (ता. चाकूर) येथील नागनाथ पाटील या शेतकऱ्याने आपल्या दोन एकरवरील पपई बागेवर रोटाव्हेटर फिरवून पपईची शेती मोडीत काढली आहे. लागवडीचा खर्च, फवारणीसाठी औषधे, खत उसनवारी, उधारीवर केले आहेत. नुकसानीचे संकट शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी टाकत आहे. त्याची भरपाई कोण देणार, या विवंचनेत शेतकरी आहेत.


पपईच्या बागेसाठी खूप मेहनत घेतली होती. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लागवड केली होती. फळधारणा चांगली झाली होती. काही माल विक्रीसाठी पाठवला होता. आता टाळेबंदीमुळे पपई विक्री थांबली आहे. माल जागेवरच खराब होत असल्याने रोटाव्हेटर फिरवून पूर्ण बाग मोडली. फळबाग योजनेतून नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे.
- नागनाथ पाटील, शेतकरी, लिंबाळवाडी
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com