रात्रीच्या वीजपुरवठ्याने शेतकऱ्याचा बळी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी रात्री विजपुरवठा केला जातो. अनेक अडचणींना सामोरे जात शेतकरी कडाक्‍याच्या थंडीतही रात्रभर जागून पिकाला पाणी देतात. आळणी (ता. उस्मानाबाद) येथे पिकाला पाणी देत असताना सर्पदंशाने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

उस्मानाबाद : रात्री शेतात पाणी देत असताना सर्पदंशाने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना आळणी (ता. उस्मानाबाद) येथे घडली. बिभीषण नांदे असे शेतकऱ्याचे नाव आहे. 

बिभीषण नांदे यांच्या शेतात सोमवारी (ता. 10) रात्री दहाच्या सुमारास वीजपुरवठा सुरू झाला. त्यामुळे नांदे पिकांना पाणी देण्यासाठी शेतात गेले. शेतात जाण्यासाठी योग्य रस्ताही नाही. शेताला पाणी देत असताना अंधारात त्यांना काहीतरी चावल्यासारखे वाटले. पाय पाण्यात असल्याने सुरवातीला फारशा वेदना न झाल्याने त्यांनी काम सुरू ठेवले. थोड्या वेळाने पाय सुजल्याचे लक्षात आले. रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांनी घरी फोन करून गाडी घेऊन येण्यास सांगितले.

मोठी बातमी - मुलं आणि महिलांच्या तस्करीबाबतचं धक्कादायक वास्तव, मुंबई एक नंबरवर तर पुणे...

कुटुंबीयांनी त्यांनी मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्‍टरांनी त्यांना अन्यत्र हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार पहाटे त्यांना सोलापूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सकाळी सहाच्या सुमारास त्यांचे निधन झाले. गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावासह परिसरातील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले होते. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. 
मोठी बातमी -   ते प्रवासी पीत होते ट्रेनच्या टॉयलेटमध्ये भरलेलं पाणी..

दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी 
शेतकऱ्यांना रात्री वीजपुरवठा करण्याचे वीज वितरण कंपनीचे धोरण आहे. हे धोरण राबवू नये अशी शेतकऱ्यांकडून वारंवार मागणी होत आहे. या मागणीसाठी काही ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलनेही केली. तरीही कंपनीकडून शेतीसाठी रात्रीच वीजपुरवठा केला जात आहे.

दिवसा पुरेशी वीज उपलब्ध होत असेल तर रात्री पुरवठा करण्याचा अट्टहास कशासाठी? असा संतप्त सवाल शेतकरी करीत आहेत. रात्रीच्या वीजपुरवठ्याचा हा बळी असल्याची चर्चा शेतकऱ्यांत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer dies of snake bite