Farmer : कृषिपंपांसाठीच्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; येथे करा अर्ज | Latest Marathi News | Breaking Marathi News | Marathi Tajya Batmya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

solar agriculture pump

Farmer : कृषिपंपांसाठीच्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; येथे करा अर्ज

छत्रपती संभाजीनगरः कृषिपंपांना दिवसा नियमित व खात्रीशीर वीजपुरवठा देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा दुसरा टप्पा राज्य शासनाने जाहीर केला आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सौर प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी ३३ केव्ही उपकेंद्रापासून १० किमी पर्यंतची सरकारी जमीन तर ५ किमी पर्यंतच्या खासगी जमिनीची महावितरणला गरज आहे.

खासगी जमिनीसाठी शेतकऱ्यांना पूर्वी एकरी ३० हजार दिले जात होते. त्यात आता वाढ करून ५० हजार वार्षिक भाडे देण्यात येणार आहे. तसेच शासकीय जमीन देणाऱ्या ग्रामपंचायतींनाही १५ लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. सौर प्रकल्पांतून निर्माण होणारी वीज कृषिपंपांना दिवसा दिली जाणार आहे. असे सौर प्रकल्प छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातही उभारण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.

शेतकऱ्यांना मिळणार भूईभाडे

अद्यापपर्यंत महावितरणला प्रकल्पासाठी जितकी जमीन हवी त्यापैकी केवळ १० टक्के जमीन सध्या उपलब्ध झाली आहे. या जमिनीसाठी शेतकऱ्यांना दरवर्षी ५० हजार प्रतिएकर भाडे देण्यात येणार आहे. यात दरवर्षी ३ टक्के वाढ देण्यात येणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांनी या योजनेत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा यासाठी पूर्वी १० हजार रुपये असलेले प्रक्रिया शुल्क आता केवळ १ हजार करण्यात आले आहे. वीज उपकेंद्रापासून जवळ असणाऱ्या जमिनीला प्राधान्य देण्यात येणार असून या योजनेत उत्स्फूर्तपणे सहभागी होणाऱ्या ग्रामपंचायतींनाही १५ लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे.

-संकेतस्थळावर साधा संपर्क

या योजनेमुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होऊन ग्रामीण विकासाला हातभार लागणार आहे. या योजनेत सहभागी होऊन आपली जमीन भाडेतत्वावर देण्यासाठी शेतकऱ्यांनी https://www.mahadiscom.in/solar-mskvy/index_mr.php या संकेतस्थळावर अर्ज करावा किंवा महावितरणच्या नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आणि आवश्यक आहे. म्हणूनच या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन शेतकरी व ग्रामपंचायतींनी जागा देण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.

- डॉ. मुरहरी केळे (मुख्‍य अभियंता, महावितरण )