
मांडाखळी (ता. जि.परभणी) येथील शेतकरी सत्यभामा प्रभाकर लोहट यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ई-मेलद्वारे मागणी केली
परभणी : परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या घरात मोठ्या प्रमाणाक कापूस शिल्लक असून खरेदीअभावी घरात असल्याने धोकादायक आहे. तसेच आर्थिक गरजांसाठी कापूस विक्री आवश्यक असल्याने कापूस खरेदी सुरू करण्याची मागणी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई-मेलद्वारे मांडाखळी (ता. परभणी) येथील शेतकरी महिलेने केली असून आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
कोरोनामुळे लॉकडाउन झाल्यानंतर परभणी जिल्ह्यात शेतमालाची खरेदी बंद झाली आहे. अजूनही अनेक शेतकऱ्यांकडे कापूस, तूर आहे. सीसीआय, कापूस पणन महासंघ, तसेच खासगी व्यापारी यांनी खरेदी बंद केल्याने अजूनही हजारो क्विटंल कापूस शेतकऱ्यांच्या घरात आहे. कापूस विक्री झाला तर आर्थिक अडचण दूर होणार आहे. तसेच कापूस घरात ठेवणे धोक्याचे आहे. त्यामुळे शेतकरी कापूस खरेदी सुरू करण्याची मागणी करू लागले आहेत. त्यासाठी मांडाखळी येथील महिला शेतकरी सत्यभामा प्रभाकर लोहट यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाककरे यांनी ई-मेल पाठवून आपली व्यथा सांगितली आहे. लॉकडाउनच्या काळात मुख्यमंत्र्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या अडचणी केवळ एका संदेशात दूर केल्या आहेत. त्यामुळे आता लोहट यांच्या ई-मेलचची कितपत दखल घेतली जाते, त्याकडे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - भाजीपाला, फळांची जागेवरच नासाडी
काय लिहिले आहे मेलमध्ये
मी सत्यभामा प्रभाकर लोहट (रा. मांडाखळी, ता. जि. परभणी) येथील शेतकरी असून माझा संपूर्ण कापूस अजून घरी आहे. कोरोनामुळे सध्याची परिस्थिती गंभीर आहे. आपण आणि मा. राजेशजी टोपे आपणच आमची आशा आहात. या संकटसमयी आम्ही तुमच्या सोबत आहोत. नियमांचं पालन करत आहोत. परंतु, शेतकऱ्यांची पण परिस्थिती गंभीर आहे. वर्षभर राबराब राबून, खर्च करून घरात आलेला कापूस अजूनही तसाच घरी आहे. बाकी इतर कडधान्य तरी घरी साठवता येईल. परंतु, कापूस घरी ठेवणे अत्यंत धोकादायक आहे. तसेच तो साठवतादेखील येत नाही. सध्या ऊन खूप तापत आहे व एखादी ठिणगी पण कापसाची राख करू शकते, हा विचारच फार त्रासदायक आहे. तेव्हा घरातील कापूस खरेदी व्हावा हीच आम्हा परभणी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांची इच्छा आहे. कारण बऱ्याच दिवसांपासून कापूस खरेदी बंद आहे. माल जर घरी राहिला तर नवीन वर्षात बी- बियाणे, खत खरेदी करायचाही सवाल आहे. आम्हाला माहीत आहे, तुम्ही खूप मेहनतीने कोरोनाचा लढा लढत आहात, आम्ही मावळे पण तुमच्या सोबत आहोतच. परंतु, आमच्या कापसाच्या प्रश्नावरदेखील तुम्हीच आमची शेवटची आशा आहात. नक्कीच आपल्या निर्णयाच्या प्रतीक्षेत.....