esakal | शेतकऱ्याच्या मुलीची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड
sakal

बोलून बातमी शोधा

osmanabad

शेतकऱ्याच्या मुलीची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद : शेतकऱ्याच्या मुलीने क्रिकेटसारख्या खेळामध्ये चुणूक दाखवून महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळविले आहे. भूम तालुक्यातील पाडोळी गावच्या प्रिया लिंबराज कोकरे या मुलीची १९ वर्षांखालील महाराष्ट्राच्या महिला क्रिकेट संघामध्ये निवड झाली आहे. धुळे येथे २८ ते ३० ऑगस्टदरम्यान ही निवड चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये २५० पेक्षा अधिक महिला खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. त्यातील ४० जणांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रिया कोकरेचाही समावेश आहे.

सामान्य कुटुंबातील या मुलीने खेळामध्ये करिअर करण्याचा विचार करून थेट कोल्हापूर गाठले. आता पुण्यामध्ये ती प्रशिक्षण घेत आहे. भूमसारख्या शहरामध्ये खेळाच्या सुविधा मिळण्यासाठी काही अडचणी होत्या. पण, क्रिकेट खेळात काहीतरी करून दाखविण्याचा उद्देश उराशी बाळगून ही खेळाडू कोल्हापुरात गेली. त्या ठिकाणी तीन वर्षांपासून अथक मेहनत घेऊन तिने महाराष्ट्राच्या संघात प्रवेश मिळविला आहे. धुळे येथे महाराष्ट्राच्या संघाची निवड करण्यासाठी निवड चाचणी घेण्यात आली. बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया यांच्यावतीने गुजरात राज्यामध्ये सुरत येथे स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

२० सप्टेंबरपासून या स्पर्धेला सुरवात होणार आहे, यामध्ये प्रिया कोकरे ही फिरकी गोलंदाज व मधल्या फळीतील फलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब असून, महाराष्ट्राच्या महिला संघात एका ग्रामीण मुलीची निवड झाली आहे. तिची अंतिम संघात देखील निवड होईल, असा विश्वास प्रियाने व्यक्त केला आहे.

loading image
go to top