हेक्‍टरी 25 हजार रुपये नुकसानभरपाई द्या 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

  • केंद्रीय पथकाकडे शेतकऱ्यांची मागणी
  • अधिकाऱ्यांनी केली पिकांची पाहणी 
  • सर्वच महसूल मंडळात अतिवृष्टी
  • बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद

माजलगाव (जि. बीड) - तालुक्‍यात परतीचा जोरदार पाऊस व अवकाळी पावसाने खरीप हंगामातील सर्वच पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त पिकांच्या नुकसानीची पाहणी केंद्रीय पथकाने शनिवारी (ता.23) केली. 

पावसाळ्याच्या सुरवातीला दडी मारून बसलेला पाऊस पावसाळ्याच्या शेवटी संपला की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती; परंतु नंतर सप्टेंबरच्या शेवटी व पूर्ण ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने तालुक्‍यातील सर्वच महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. याची पाहणी करण्यासाठी तालुक्‍यात शनिवारी केंद्रीय पथक दाखल झाले.

हेही वाचा - राजस्थानात झालेल्या अपघातात औशातील सहाजणांचा मृत्यू

पथकाने शेतकऱ्यांच्या डाळिंब, पपई बाग, कपाशी, सोयाबीन पिकांची पाहणी केली. पथकप्रमुख डॉ. व्ही. थिरुपुगाह, डॉ. के. मनोहरण, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी पीकनुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. उपविभागीय अधिकारी शोभा ठाकूर, तहसीलदार प्रतिभा गोरे, तालुका कृषी अधिकारी जनार्दन भगत, गटविकास अधिकारी बळीराम चव्हाण उपस्थित होते. दरम्यान, तेलगाव रस्त्यावरील शिवाजी रांजवण यांच्या शेतातील पिकांची पाहणी करण्यात आली. 

हेक्‍टरी 25 हजार नुकसानभरपाई द्यावी 
पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. तालुक्‍यातील निपाणी टाकळी येथील शेतकरी नारायण आप्पाराव सोळंके (वय 45) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. अन्य शेतकऱ्यांचीही अवस्था यापेक्षा वेगळी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी किमान 25 हजार हेक्‍टरी भरपाई देण्यात यावी, अशी मागणी गंगाभीषण थावरे यांच्यासह शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 

मदत कधी मिळणार? 
सर्वच मंडळात झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक आले तेही एक महिन्यानंतर, त्यामुळे आता मदत कधी मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers Demand 25 thousand per hectare