बीड जिल्ह्यात हजारो हेक्‍टरवरील पिकांना सड, गंभीर आर्थिक संकट 

चंद्रकांत राजहंस 
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्‍यात पावसाने 51 हजार हेक्‍टर क्षेत्रावरील पिके परतीच्या पावसाने उद्‌ध्वस्त झाले आहेत. पावसाळ्यात वेळेवर पाऊस झाला नाही. शेतकऱ्यांनी कसेतरी पिके जगविली; पण शेवटच्या टप्प्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. परिणामी, शेतात होत्याचे नव्हते झाले आहे. 

शिरूर कासार (जि. बीड) - शिरूर कासार तालुक्‍यात दोन वर्षांपूर्वी दुष्काळ परिस्थितीने शेतकरी होरपळून निघाले होते; पण यंदा खरीप हंगामात रिमझिम पडणारा पाऊस रब्बीत धो धो बरसत असल्याने 51 हजार हेक्‍टर क्षेत्रातील पिके उद्‌ध्वस्त झाली आहेत. पिके पाण्यात सडत पडल्याने शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. 

शिरूर तालक्‍यात गेल्या हंगामात पाऊस नसल्याने खरिपाबरोबर रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान होऊन खर्चही निघाला नाही. पाणी, पशुधनाचा प्रश्‍न गंभीर झाला होता. या परिस्थितीत यंदा खरीप हंगामात जूनअखेर पाऊस झाल्याने पिकांची परणी करून आर्थिक पुंजी बी-बियाणांवर खर्च करून टाकली होती. यंदाच्या हंगामातील पिके चांगली येतील, या आशेवर पिकांना खत-पाण्यावर भरमसाट खर्च केला; पण रिमझिम पावसावरच पिकांची वाढ झाली नाही. मात्र, पोळ्यानंतर दमदार पाऊस झाल्याने पिके जोमात वाढली.

आता चांगले उत्पन्न निघणार या आशेवर शेतकरी मेहनत करत होतो. ऑक्‍टोबरच्या सुरवातीला बाजरी, मका, मूग, उडीद, भुईमूग, तीळ, सोयाबीन, करळ पिकांची काढणी तर कापूस पिकांची वेचणी सुरू होणार होती. या पिकाच्या उत्पन्नातून किमान पिकावर खर्च झालेला खर्च तरी निघणार, या आशेवर शेतकरी समाधानी होता; पण पंधरा दिवसांपासून परतीच्या पावसाने दमदारपणे हजेरी लावत धो धो बरसत दोन वर्षांपूर्वी कोरडे पडलेले प्रकल्प, तलाव, नदी-नाले, ओढ्याला पाणी आले; पण खरिपाच्या हंगामातील पिकांना कोंब येऊ लागली आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers in financial crisis