निराश मनावर शेतकऱ्यांची 'योग' फुंकर 

वाटूर : आर्ट ऑफ लिव्हिंगच्या श्री श्री ज्ञानमंदिर परिसरात ध्यानसाधना करताना शेतकरी. 
वाटूर : आर्ट ऑफ लिव्हिंगच्या श्री श्री ज्ञानमंदिर परिसरात ध्यानसाधना करताना शेतकरी. 

वाटूर (जि. जालना) -  जगाचा पोशिंदा; पण अस्मानी संकट, व्यवस्थेकडून व्यवहारात होणारी फसवणूक यामुळे निराश झालेल्या मनावर शेतकरी आता योगसाधनेची फुंकर घालत आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या परतूर तालुक्‍यातील वाटूर येथील श्री श्री ज्ञानमंदिरात अनेकजण पहाटेच नित्य हजेरी लावत आहेत. 

कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टीमुळे शेतीचे होणारे नुकसान, त्यातच सर्व काही ठीक असेल तर बाजारात होणारी फसवणूक यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरते. काहीजण खचून, मोडून जातात, टोकाची पावले उचलतात. अर्थात, नित्य नव्याचा ध्यास घेणे, नवनिर्मिती शेतकऱ्यांचे शक्तिस्थळ. जीवनातील सकारात्मकताही त्याची जमेची बाजू. त्यामुळे अनेकजण नैराश्‍याचे मळभ दूर करीत आता ध्यानाचा मार्ग अवलंबिताना दिसत आहेत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना धीर, सकारात्मक आधार देण्यासाठी श्री श्री ज्ञानमंदिरासारखे स्थळही हितकारक ठरत आहेत. विशेष म्हणजे या ज्ञानमंदिरात नित्य शेतकऱ्यांना निवासी प्रशिक्षण दिले जात आहेत. त्यामध्ये ध्यान, ज्ञान, आणि गाण असा त्रिवेणी संगम साधला जात आहे.

नैसर्गिक शेतीचे धडे 
ध्यानसाधनेसोबतच नैसर्गिक शेतीबाबतही ज्ञानमंदिरात मार्गदर्शन केले जात आहे. त्यादृष्टीने कीटकनाशके; तसेच बुरशीनाशक निर्मितीचे प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात येत आहे. सेंद्रिय शेतीतून फळलागवड, भाजीपाला लागवडीबाबत मार्गदर्शन, पाण्याच्या नियोजनाबाबतही श्रमदानासह लोकसहभागातून प्रत्यक्ष कार्य केले जात आहे. 

शेतकरी देशाचा कणा; मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा-पुन्हा आघात होत आहेत. त्यामुळे मानसिकदृष्ट्या खचून जाणाऱ्या शेतकऱ्यांना धीर देणे काही काळाची गरज आहे. शेतकऱ्यांमध्ये सकारात्मकता वाढीस लागावी, त्याला तणावमुक्‍त करण्यासाठी योग, ध्यानधारणा, भजन, सत्संगाच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे त्याला जीवनात वाटचालीसाठी नवी उमेद मिळेल. 
गजानन वायाळ, 
प्रशिक्षक, आर्ट ऑफ लिव्हिंग 

शेतकरी सुखी तर सर्व जग सुखी. त्यामुळे शेतकऱ्यांना-शेतीला वाचविणे ही सर्वांची जबाबदारी आहे. योगसाधनेचा आधार तर त्यांना देत आहोतच, शिवाय शेतकऱ्यांच्या शाश्‍वत विकासासाठी आम्ही पाणलोट विकास कार्यक्रम हाती घेतले आहेत. कोरडवाहू शेतकऱ्याला हक्‍काचे पाणी मिळावे म्हणून आम्ही पुढाकार घेतला. धीर गमावून बसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे कार्य अविरत सुरू आहे. 
पुरुषोत्तम वायाळ, 
मराठवाडा समन्वयक, आर्ट ऑफ लिव्हिंग  

सध्याच्या स्थितीत शेतकरी ताणतणावाला सामोरे जावे लागत आहे. अशा स्थितीत श्री श्री ज्ञानमंदिराचा आम्हाला आधार आहे, येथे ध्याससाधनेसोबत मार्गदर्शन मिळते, समुपदेशन केले जात आहे. तणावग्रस्त शेतकरी मनमोकळा संवाद साधत आहेत. मन हलके होत आहे. 
अंबादास मरळ, शेतकरी, यदलापूर 

शेतीतील उत्पादन कमी झाले म्हणून खचून न जाता शेतीपूरक जोडव्यवसाय कसे करता येतील याकडे शेतकऱ्यांना वळविले जात आहे. विशेषत: महिला शेतकऱ्यांची गट स्थापन करण्यासह शेतीपूरक नावीन्यपूर्ण कल्पना आत्मसात करण्यासाठी पावले उचलत आहोत. यासाठी श्री श्री ज्ञानमंदिराची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. 
अर्चना वायाळ, अध्यक्ष, कृषी महिलागट 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com