esakal | शेतकऱ्यांचा ‘मेसेज’ आणि मुख्यमंत्र्यांची तत्परता...!

बोलून बातमी शोधा

file photo

जवळाबाजार (जि.हिंगोली) येथील शेतकरी भाऊ पाटील यांचा आडविलेला ट्रक मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने पोलिसांनी सोडविला.

शेतकऱ्यांचा ‘मेसेज’ आणि मुख्यमंत्र्यांची तत्परता...!

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी : जवळाबाजार (जि.हिंगोली) येथील एका फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील संत्रा घेवून जाणाऱ्या ट्रकला पोलिसांनी आडविल्यानंतर सदरील शेतकऱ्यांने थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना ‘एसएमएस’ केला. मुख्यमंत्र्यांनीदेखील तातडीने याची दखल घेत परभणीचे पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांना फोनद्वारे शेतकऱ्यांची अडवून करू नका, असे सांगून ट्रक सोडण्याचे आदेश दिले. पोलिस अधीक्षकांनीदेखील मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे तातडीने पालन करून शेतकऱ्यांला थेट फोन करून प्रश्नाची सोडवणुक केली.


 जवळाबाजार (जि.हिंगोली) येथील शेतकरी भाऊ पाटील यांच्या शेतात संत्रा फळ बाग आहे. हा संत्रा भाऊ पाटील यांनी उतरविला होता. हा माल एका ट्रकमध्ये भरून त्यांना बंगळुरू येथे पाठवायचा होता. परंतू ‘कोरोना’ विषाणुच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्याच्या सीमा सिल करण्यात आलेल्या आहेत. त्याच बरोबर संचारबंदीदेखील लागू आहे. भाऊ पाटील या शेतकऱ्यांच्या शेतातील संत्रा घेवून एक ट्रक बंगळूरूच्या दिशेने निघाला. परंतू, हिंगोली जिल्हा सोडताच झीरोफाटा (जि.परभणी) येथे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी हा ट्रक अडविला. त्या ठिकाणी एक ते दिड तास हा ट्रक उभा होता. कसे बसे त्या ठिकाणावरून ट्रक सुटल्यानंतर परत हा ट्रक ढालेगाव (ता.पाथरी जि.परभणी) येथील सीमेवर आडविण्यात आला. वारंवार ट्रक आडविला जात असल्याने ट्रकमध्ये भरलेला ९ टन संत्रा खराब होईल याची भिती भाऊ पाटलांना लागून राहीली होती. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला परभणीचे निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांना फोनवरून सदर घटनेची माहिती दिली. 


हेही वाचा - ‘लॉकडाऊन’ने खासगी दवाखाने बंद

थेट मुख्यमंत्र्यांना केला ‘एसएमएस’
श्री.पिनाटे यांनी फोन करून ट्रक सोडण्याचे सांगितले. परंतू असा प्रकार दुसऱ्या जिल्ह्यात होऊ नये म्हणून भाऊ पाटलांनी थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना स्वताच्या मोबाईलव्दारे एसएमएस करून या प्रकाराची माहिती दिली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी थोडाही वेळ न दवडता थेट परभणीचे पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांना शेतकऱ्यांचे शेतमाल घेवून जाणारे ट्रक अडवू नका व तातडीने भाऊ पाटील या शेतकऱ्यांचा ट्रक सोडावा असे आदेश दिले. पोलिस अधिक्षकांनी ही थोडासुध्दा वेळ न दवडता भाऊ पाटलांशी संपर्क साधून झालेल्या प्रकाराची माहिती घेतली व ट्रक यापुढे आडविला जाणार नाही याची दक्षता घेणार असल्याचे सांगितले. भाऊ पाटील हे शेतकरी असल्याने त्यांनीही पोलिसांबदद्ल कृतज्ञता व्यक्त करीत पोलिस अधीक्षकांचे आभार मानले.

हेही वाचा - ‘लॉकडाऊन’ ने गव्हाची चढ्या दराने विक्री !


....तर ९ टन संत्रा फेकण्याची वेळ
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सर्व सामान्य शेतकऱ्याने केलेल्या एसएमएसची दखल घेतली नसती आणि परभणी पोलिस अधीक्षकांना आदेश दिले नसते तर भाऊ पाटील यांचा ९ टन संत्रा खराब होऊन रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली असती. कारण संत्रा तोडल्यानंतर काही काळातच ठराविक ठिकाणी पोहचावा लागतो. अन्यथा तो खराब होऊन सडतो.