हलक्याने काही होईना अन् मोठा पाऊस येईना 

कैलास चव्हाण
Sunday, 21 June 2020

पालम, गंगाखेड, सोनपेठ तालुक्यात एकदिवसआड हलका पाऊस हजेरी लावत आहे. परभणी, जिंतूर तालुक्यातदेखील रिमझिम हजेरी लावत हुलकावनी देत आहे. त्यामुळे हलक्याने काही होईना अन् मोठा पाऊस येईना असे म्हणण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १३३.४३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या १५.९ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
 

परभणी :  परभणी जिल्ह्यात शनिवारी (ता. २०) रात्री काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, अद्यापही मोठा पाऊस होत नसल्याने पेरणीचा खोळंबा झाला आहे. काही भागात दररोज केवळ हलका पाऊस हजरी लावत असून या पावसावर पेरणी करणे शक्य नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
मागील काही दिवसांपासून पाऊस गायब झाल्याच्या स्थितीत आहे. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यानंतर मान्सूनचे आगमनदेखील जोरदार झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरवात केली. परंतु, लगेच काही भागातून पाऊस गायब झाल्याने पेरणीचा खोळंबा झाला आहे. ज्या भागात पाऊस सातत्याने पडत आहे, अशा भागातील पेरणी पूर्ण होत आली आहे. परंतु, अजूनही जिल्ह्यातील निम्या क्षेत्रावरील पेरणी खोळंबली आहे.

हेही वाचा : कोण म्हणतंय समाजातली माणूसकी आटलीय !
 

रिमझिम पावसाचे स्वरूप

शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे पावसाची शक्यता वाटत होती. अखेर रात्री नऊच्या सुमारास पावसाला सुरवात झाली. परंतु, पाऊस रिमझिम स्वरूपाचा होता. सेलू, सोनपेठ, पूर्णा तालुका वगळता अन्य भागात अतिशय हलक्या स्वरूपात पावसाने हजेरी लावली. अन्य भागात मात्र, पाऊस झाला नाही. जवळपास सर्वच भागात रिमझिम पावसाचे स्वरूप होते. दरम्यान, पालम, गंगाखेड, सोनपेठ तालुक्यात एकदिवसआड हलका पाऊस हजेरी लावत आहे. 

१५.९ टक्के पावसाची नोंद

 परभणी, जिंतूर तालुक्यातदेखील रिमझिम हजेरी लावत हुलकावनी देत आहे. त्यामुळे हलक्याने काही होईना अन् मोठा पाऊस येईना असे म्हणण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १३३.४३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या १५.९ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

हेही वाचा :​ नांदेडच्या युवकांचा स्पर्धा परिक्षेत डंका... -

केवळ निम्या क्षेत्रावर पेरणी
पावसाची हुलकवाणी सुरू असल्याने अनके शेतकऱ्यांनी पेरणी थांबवली आहे. त्यामुळे आतापर्यंत निम्याच क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात यंदा खरिपासाठी पाच लाख १७ हजार १४२.६५ हेक्टर प्रस्तावित करण्यात आले आहे. आतापर्यंत दोन लाख ७१ हजार ७९ हेक्टरवरील पेरणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

शनिवारी झालेला तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)
परभणी ७.८८, पालम ०३, पूर्णा १३.४०, गंगाखेड ७.५०, सोनपेठ १८, सेलू २२.६०, पाथरी २.३३, जिंतूर ११.८३, मानवत २९, एकूण १२.८४.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers wait for heavy rains Parbhani News