चक्क अंत्यविधीचे साहित्य घेऊन शेतकरी गेला मंत्रालयात

धोंडिबा बोरगावे
Thursday, 2 January 2020


बँकेकडून उचललेले पीककर्ज थकल्यामुळे दिवसेंदिवस त्यात वाढ होऊन त्याच कर्जाचा डोंगर झाल्याने नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्यातील हतबल शेतकऱ्याची व्यथा.

फुलवळ, (ता. कंधार, जि. नांदेड)ः कंधार तालुक्यातील मोहिजा (परांडा) येथील शेतकरी धनाजी जाधव (वय ४०) यांनी कुरुळा येथील एका बँकेकडून उचललेले पीककर्ज थकल्यामुळे दिवसेंदिवस त्यात वाढ होऊन त्यात कर्जाचा डोंगर झाला. त्यातच सततची नापिकी, निसर्गाचा अवकाळी फटका, दुष्काळी परिस्थिती अशा अनेक बाबींमुळे घरखर्च, वडिलांचा दवाखाना आणि मुलांचे शिक्षण या सर्व अडचणींमुळे धनाजी जाधव हे हतबल झाले होते.
 
आमचे कर्ज माफ होणार का?
अशातच महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने एकंदरीत सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल, अशी प्रत्येक शेतकऱ्याला आशा लागली होती. परंतु, कमी, अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी चालू असून निकषाप्रमाणे दोन लाख रुपयांपर्यंतचेच कर्ज माफ होणार असल्याचे या सरकारने जाहीर केल्यामुळे आपले कर्ज माफ होणार का नाही, या चिंतेत असलेल्या धनाजी जाधव या शेतकऱ्याने आपल्या अंत्यसंस्काराचे साहित्यच सोबत घेऊन थेट मंत्रालय गाठले आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या.

मंत्रालयात ठरला चर्चेचा विषय 
सध्या सदर बँकेचे शेतकरी धनाजी जाधव यांच्यावर १७ लाख रुपयांचे थकीत कर्ज बाकी झाल्याचे कळते. या १७ लाख रुपये कर्जाच्या पोटी बँकेने एक कोटी ५० लाख रुपये किमतीची जमीन मालमत्ता गहाण ठेवून घेतली असल्याचा आरोप धनाजी जाधव यांनी केला. जाधव यांनी कर्जमाफीसाठी स्वतःचे अंत्यसंस्काराचे साहित्य घेऊन थेट मंत्रालय गाठल्याने मंत्रालयात चर्चेचा विषय ठरला. यादरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नियोजित दौऱ्यावर असल्याने मंत्रालयात त्यांची भेट झाली नाही. परंतु, स्वतः शेतकरी अंत्यसंस्कारचे साहित्य सोबत घेऊन आला आहे, हे कळताच शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर व टीव्ही चॅनलचे प्रतिनिधी यांनी धनाजी जाधव यांची व्यथा सविस्तर ऐकून त्यांनी मध्यस्थी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वेळ घेऊन शेतकरी धनाजी जाधव यांना भेटीसाठी बोलावले आणि जाधव यांनी आपल्या सर्व व्यथा मुख्यमंत्री यांच्यासमोर मांडल्या. 

हेही वाचा ः शेतकऱ्यांनी कर्ज खाते ‘आधार’शी जोडावी

त्यांनी व्यथेत सांगितले की, १७ लाख रुपये कर्जासाठी एक कोटी ५० लाख रुपयांची गहाण असलेली शेती विकून ते कर्ज फेडण्याची आपली तयारी आहे. परंतु, सदर बँक त्या शेतीची कागदपत्रसुद्धा द्यायला तयार नाही. तर मग आपण कशाने कर्ज फेडावे? असा प्रश्न उपस्थित केला. धनाजी जाधव यांच्या वडिलांचे मध्यंतरीच्या काळात दीर्घ आजाराने निधन झाले. त्यासाठी दवाखान्यात अमाप पैसा खर्च झाला. तसेच मुलांचे शिक्षण, संसाराचा गाडा हाकता हाकता कर्जाचा डोंगर आपल्या माथी थोपला असून यातून आपली सुटका करावी, अशी विनंती जाधव यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली.

जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या सूचना 
धनाजी जाधव यांची व्यथा ऐकून घेऊन मुख्यमंत्री ठाकरे यांनी नांदेडचे जिल्हाधिकारी यांना फोन करून जाधव यांचा प्रश्न सोडविण्यासाठी आदेशीत केले. परंतु, धनाजी जाधव यांच्यासारखे असे कित्येक शेतकरी आहेत की ते मुख्यमंत्री यांना भेटण्यापेक्षा आत्महत्या हाच शेवटचा पर्याय समजून मृत्यूला कवटाळतात. अशा सर्व शेतकऱ्यांच्या व्यथा कोण ऐकणार? हाही प्रश्न गंभीर आहे. सरकार कोणतेही येवो निकष फक्त शेतकऱ्यांनाच का लागतात?  शिवसेनेचा तर ‘आपले सरकार आले तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार’ हा नाराच होता. या वाक्यालाच धरूनच बहुतांश शेतकरी आज ना उद्या शिवसेना शेतकरी कर्जमुक्ती करेल याच आशेने जगत आहेत. एवढे मात्र नक्की.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers went to the ministry with the funeral material